नाशिक – महसूल विभागात नायब तहसीलदार असल्याचे भासवून एकाने लग्नाचे आमिष दाखवत तहसीलदारपदी बढती आणि पुणे येथे नियुक्ती मिळविण्याच्या नावाखाली शहरातील महिलेला लाखो रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील धारणगाव येथील निनाद प्रवीण कापुरे ( निनाद विनय कापुरे) याच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहरातील ३८ वर्षीय महिलेने तक्रार दिली. ऑक्टोबर २०२४ मध्ये संशयित महिलेच्या संपर्कात आला होता. महसूल विभागात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असल्याची बतावणी केल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. संशयिताने विश्वास संपादन करीत महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. या काळात त्याने तहसीलदारपदी बढती मिळणार असून पुणे येथे नियुक्तीसाठी मोठी रक्कम लागणार असल्याचे सांगितले. यासाठी सात लाख रुपयांची मदत मागितली. ही रक्कम तीन ते चार दिवसात परत करण्याचे आश्वासन दिले. लग्नानंतर आपले भविष्य चांगले होईल, अशा भूलथापा देत महिलेला पैसे जमविण्यास भाग पाडले. महिलेने नातेवाईकांकडून रक्कम गोळा केली. तीन आणि चार डिसेंबर रोजी एकूण सात लाख रुपये वेगवेगळ्या माध्यमातून संशयिताच्या बँक खात्यात वर्ग केले. अनेक दिवस उलटूनही पैसे न मिळाल्याने महिलेने पाठपुरावा सुरू केला. तेव्हा संशयिताकडून थोडा अडचणीत आहे, व्याजासह पैसे परत करेल, असे सांगितले गेले. संशयित पुण्यात असल्याचे सांगायचा. परंतु, भ्रमणध्वनीवर आजूबाजूचे आवाज अहिराणीत बोलणाऱ्यांचा येत असे. त्याचे वागणे आणि बोलणे यावरून संशय बळावला. उडवाउडवीची उत्तरे देऊन संशयित वेळ निभावून नेत असल्याचे लक्षात आल्यावर महिलेने चौकशी केली असता त्याची बनवेगिरी उघड झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयित निनाद प्रवीण कापुरे ( निनाद विनय कापुरे, ३०, साठेनगर, गॅस एजन्सीजवळ, एरंडोल रोड, धारणगाव, जळगाव) याने बनावट नाव सांगून दिशाभूल केली. नायब तहसीलदार असून तहसीलदारपदावर बढती मिळणार असल्याचे खोटे सांगितले. लग्नाचे आमिष दाखवत बढतीसाठी सात लाख रुपये घेतले. पोलिसात तक्रार करणार असल्याचे समजल्यावर त्याने काही दिवसांपूर्वी महिलेच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले. संशयिताने पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.