मनमाड : गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच पितृपक्षाला प्रारंभ झाला. या काळात पितरांचे पूजन केले जाते. त्यासाठी त्यांना जेवणही दिले जाते. या पितरांच्या जेवणासाठी विविध भाज्या लागतात. दरवर्षी पितृपक्षाला सुरुवात झाल्यावर बाजारात मागणी वाढून भाज्यांचे दर वाढतात. त्यामुळे ग्राहकांना पितृपक्षात भाज्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. नाशिक जिल्ह्यात मनमाडसह इतर अनेक शहरांमध्ये यंदा पितृपक्ष प्रारंभ होऊनही वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरवेळी पितृपक्षात पालेभाज्यांच्या दरात वाढ होते. पितरांना जेवण देण्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्यांची आवश्यकता असते. त्यामुळे पितृपक्षात गवार, डांगर, चक्की, कारले, गिलके, चवळी, भेंडी, अळूची पाने, दोडके आदी प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. नाशिक जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात काही दिवस संततधार पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढले होते.
पितृपक्षात दर अधिकच वाढतील अशी अपेक्षा होती. परंतु, काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने भाजीपाल्यांवरील रोग किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे सर्व भाज्यांची बाजारात आवक होत आहे. भाज्यांची आवक वाढल्याने दरही कमी झाले. पितरांना जेवणासाठी अनेक भाज्या स्वस्त झाल्याने महिलांमध्ये समाधान आहे, सध्या भाऊबंदकी, नातेवाईक, मित्रमंडळींना जेवणाला बोलावले जाते. परंपरेने चालत आलेली ही प्रथा आजही सुरू आहे. साहजिकच घरोघरी पितृपक्ष म्हणून कार्यक्रमासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रित केले जाते. सध्या महत्त्वाचा भाजीपाला स्वस्त मिळू लागल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो १५० रुपये जाळी (कॅरेट), वांगे सरासरी ५०० रुपये जाळी, भेंडी ३० रुपये किलो. मिरची १८ रुपये किलो. गवार ७० रुपये किलो. कोबी पाच रुपये किलो. फ्लॉवर २५ रुपये किलो. दोडके ३० रुपये किलो. गिलके ३० रुपये किलो, कारले २० रुपये किलो. वाल ३० रुपये किलो, काकडी १५ रुपये किलो. शिमला मिरची १५ रुपये किलो असे भाव आहेत. मेथीची भाजी सरासरी २२२० रुपये शेकडा, कोथिंबीर ७०५ रुपये शेकडा आहे. बाजार समितीत आवक वाढल्याने किरकोळ बाजारातील भाजीपाला दर घसरले आहेत. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये अशी स्थिती आहे.