नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद डोळ्यांसमोर ठेवत अखंडपणे काम सुरू असते. परंतु, सध्या नाशिक विभागातील विभाग नियंत्रकांची खुर्ची दीड महिन्याहून अधिक कालावधीपासून रिकामी आहे. प्रभारी अधिकाऱ्यांना नियंत्रकाचा भार वाहवा लागत आहे. विभाग नियंत्रक नसल्याने कामाला मर्यादा आल्या आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेवर आजही लोकांचा विश्वास आहे. महामंडळातील अधिकाऱ्यांमध्ये विभाग नियंत्रकाकडे महत्वपूर्ण जबाबदारी असते. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी, त्यांची बाजू , अडचणी जाणून घेण्यासाठी एका विशिष्ट दिवशी विभाग नियंत्रकांकडून वेळ राखीव ठेवण्यात येतो. प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या पाठीवर विभाग नियंत्रकांकडून शाबासकीची थाप दिली जाते. या शिवाय वर्षभरात येणारे सण, उत्सव, उन्हाळी, दिवाळी सुट्टी या कालावधीत बसच्या फेऱ्यांचे नियोजन, महामंडळाच्या वेगवेगळ्या विभागाचे काम सुरळीत सुरू आहे का, काही कर्मचाऱ्यांचे थकित देयके, चौकशी यासह वेगवेगळी कामे नियंत्रक पाहत असतात. सध्या प्रशासकीय पातळीवर कुंभमेळा नियोजनाचे वारे वाहत असतांना नाशिक विभागीय नियंत्रकपदाचा भार प्रभारींना पाहावा लागत आहे.

तत्कालीन विभाग नियंत्रक अरूण सिया यांची बदली पुणे विभागात झाली. त्यांच्या जागी प्रमोद मेहुल यांची नियुक्ती झाली आहे. परंतु, मेहुल यांनी अद्याप नाशिकचा पदभार स्वीकारलेला नाही. यामुळे नाशिक विभाग नियंत्रक पदाची जबाबदारी सोनवणे यांच्यावर प्रभारी स्वरुपात सोपविण्यात आली आहे. विभाग नियंत्रक पद रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांसह बाहेरून येणाऱ्या अभ्यांगतांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

विभाग नियंत्रक म्हणून प्रमोद नेहुल जे पुणे येथे कार्यरत होते. त्यांची बदली नाशिक येथे झाली. मात्र आजपर्यंत त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यांना बदलीचे ठिकाण दुसरे हवे. याबाबत वरिष्ठ स्तरावर त्यांनी कळविले आहे. लवकरच नवे विभाग नियंत्रक येतील.- श्रावण सोनवणे (प्रभारी विभाग नियंत्रक, नाशिक)