नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५ या वर्षासाठी ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनामार्फत २०१० पासून दरवर्षी एका अ-मराठी कवीला कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दिला जातो. रोख एक लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याआधी प्रसिद्ध कवी चंद्रकांत देवताले (हिंदी), के. सच्चिदानंदन (मल्याळम), सीतांशू यशश्चंद्र (गुजराथी), सुरजीत पातर (पंजाबी), टेमसुला आओ (इंग्रजी), विष्णू खरे (हिंदी), एच. एस. शिवप्रकाश (कन्नड), अमिताभ गुप्ता (बंगाली), नीलिमकुमार (आसामी), कुमार अंबुज (हिंदी) अशा दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कार निवड समितीत अध्यक्ष. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, कवी व अनुवादक प्रा. चंद्रकांत पाटील, डॉ. गोरख थोरात, विलास गीते यांचा समावेश होता. समितीचे समन्वयक म्हणून कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी काम पाहिले.
हरप्रसाद दास यांचा परिचय
हरप्रसाद दास यांची ३५ पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये १२ काव्यसंग्रहांचा समावेश आहे. ‘देश’, ‘अपार्थिव’, ‘प्रेम कविता’, प्रार्थना के लिये जरुरी शब्द’, ‘गर्भ गृह’ हे काव्यसंग्रह हिंदीतही प्रकाशित आहेत. ‘गर्भ गृह’ला साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला आहे. ‘वंश’ काव्यसंग्रहाला भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार मिळाला आहे. ओडिया जनजीवनाबद्दल त्यांनी तीन खंडांत इतिहास लिहिला आहे. हरप्रसाद दास यांनी केंद्र सरकारमध्ये विशेष सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. एर्नाकुलम आणि ओदिशा येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
