नाशिक : फिजिक्सवाला या खासगी पध्दतीने शिकविणाऱ्या संस्थेबरोबरचा सामंजस्य करार वादात सापडल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खासगी विद्यापीठाशी ऋणानुबंध जोडले आहेत. आफ्रिकेतील झांबियन मुक्त विद्यापीठाशी सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण संदर्भात करार करण्यात आला आहे. परंतु, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून विद्यापीठाने मात्र झांबियातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय शिक्षण आणि पदवी दिली जाणार असल्याचा दावा करुन या कराराचे समर्थन केले आहे.
नुकताच विद्यापीठाने झांबियन मुक्त विद्यापीठाशी सांस्कृतिक व शैक्षणिक देवाण-घेवाण कार्यक्रमांसाठी सामंजस्य करार केला. त्यासाठी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्रा. जयदीप निकम हे आफ्रिकेतील झांबियात गेले होते. हा करार मुक्त आणि दूरस्थ शिक्षण तसेच पूर्णवेळ शिक्षण या दोन्ही क्षेत्रातील कल्पना, कौशल्य आणि सर्वोत्तम पद्धतींच्या परस्पर देवाण-घेवाणासाठी एक चौकट प्रदान करणार असल्याचे झांबियन विद्यापीठाने म्हटले आहे. झांबियन मुक्त विद्यापीठ खासगी संस्था आहे.
जागतिक पोहोच आणि प्रभाव राखणारी मुक्त विद्यापीठे सोडून झांबियन विद्यापीठाशी केलेल्या कराराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावली बनवली आहे. त्या निकषात झांबियन विद्यापीठ बसत नसल्याचा आक्षेप घेतला जातो. परदेशी विद्यापीठाशी करार करताना सरकारची परवानगी घेतली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने बंधनकारक केलेल्या अटी पाळत आहोत का, याचा विचार करूनच विद्यापीठाने परदेशातील विद्यापीठाशी सामंजस्य करार करावा अन्यथा नाही. विद्यापीठ हे विद्यापीठ कायद्यानुसार चालविण्याची जबाबदारी कुलगुरुंची असते. – संजय खडक्कार (माजी सदस्य, विद्वत परिषद, मुक्त विद्यापीठ)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ-झांबियन मुक्त विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. विद्यापीठ ऑनलाईन शिक्षण शिकवू शकते. यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. पहिल्या टप्प्यात झांबियन विद्यापीठास ऑनलाईन संगणकीय शिक्षण हवे आहे. झांबियन खासगी विद्यापीठास शासनाची मान्यता आहे. त्या विद्यापीठात इग्नोतून एमबीए करणारे कार्यरत आहेत. संगणकाचे शिक्षण घेणाऱ्यांना संयुक्त नव्हे तर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी मिळेल. – प्रा. संजीव सोनवणे (कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)