खारघरमधील पालकाची गटशिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार; शाळा व्यवस्थापनाकडून इन्कार

पनवेल : शिकवणी शुल्कासाठी नववीच्या २३ विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढण्यात आल्याचा प्रकार खारघरमधील ‘हार्मनी पब्लिक स्कूल’मध्ये घडल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर ‘हार्मनी पब्लिक स्कूल’ व्यवस्थापनाने असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात नव्याने सामावून घेण्यात आल्याचा लघुसंदेश तक्रारदार पालकाच्या मोबाइलवर आला.

विद्यालयांनी टाळेबंदीत शिकवणी शुल्काची सक्तीने वसुली करू नये, अशा सूचना राज्य शिक्षण विभागाने ८ मे रोजी जारी केल्या आहेत. यानंतर काही विद्यालयांनी याविरोधात न्यायालयात दाद मागितली. यावर शिक्षण विभागाच्या सूचनेला न्यायालयाने स्थगिती दिली.

यानंतर खारघर हार्मनी विद्यालयाने पालकांकडे शिकवणी शुल्क वसुलीसाठी तगादा लावल्याची तक्रार दीड महिन्यापूर्वी पालकाने केली होती.  यावर तालुका गटशिक्षण अधिकाऱ्यांनी हार्मनी विद्यालयाला नोटीस बजावली. मात्र त्यानंतर पालकांनी विद्यालयाविरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती. जून महिन्यात विद्यालयाने ऑनलाइन  शिक्षण सुरू केल्यानंतर पालक आणि विद्यालय व्यवस्थापनात वाद वाढले.

गेल्या वर्षी या विद्यालयाचे सुमारे नऊ लाख रुपये इतके शिक्षणशुल्क येणे शिल्लक असल्याचे समजते. यात शिक्षकांचे वेतन, शाळेची डागडुजी यासाठी विद्यालयाकडे कमी रकमेची तरतूद आहे. तक्रारदार पालकाने तीन महिन्यांच्या टाळेबंदीत  पाल्याच्या शिकवणी शुल्काची मित्र आणि नातेवाईकांकडून जुळवाजुळव केली. टाळेबंदीपूर्वी कोणतेही शुल्क कधीच न थकवणाऱ्या तक्रारदार पालकाच्या पाल्याला गुरुवारी ऑनलाइन वर्गातून काढण्यात आले. यात अन्य २३ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.  जून आणि जुलै महिन्यांचे मिळून ३५०० रुपये शिकवणी शुल्क न भरल्याने ही शिक्षा देण्यात आल्याचे तक्रारदार पालकांचे म्हणणे आहे.

शुल्क वसुलीसाठी कोणतीही सक्ती करू नये, अशा विद्यालयांना शासनाच्या सूचना आहेत. दीड महिन्यापूर्वी पालकाने केलेल्या तक्रारीनंतर संबंधित शाळेला नोटीस बजावली होती. विद्यालय व्यवस्थापनाने अशा मुद्दय़ांवर संवेदनशील राहणे आवश्यक आहे. 

– नवनाथ साबळे, गट शिक्षण अधिकारी पनवेल</strong>

व्यवस्थापनाने शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावला नाही. विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार घडलेला नाही. तशा कोणत्याही सूचना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या नाहीत. पालकांनी त्यांच्या काही समस्या असतील तर माझ्याशी थेट मोबाइलवर संपर्क साधावा.

 – बिना थंप्पी, मुख्याध्यापिका, हार्मनी पब्लिक स्कूल