News Flash

तळोजात दिवसभर बिबटय़ाचा शोध

नवीन ठाणे अशी ओळख असणाऱ्या घोडबंदर रोड परिसरात शेजारील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे अधूनमधून भरवस्तीत शिरतात.

(संग्रहित छायाचित्र)

नागरिकांमध्ये घबराट : स्थलांतर केल्याची शक्यता

गेल्या वर्षी ऐन गुढीपाडव्याला उल्हासनगर शहरातील भरवस्तीत बिबटय़ा आढळल्याने स्थानिक रहिवासी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ झाली होती. त्यानंतर आता तळोजा औद्योगिक वसाहतीत बिबटय़ाचा वावर दिसून आला आहे. शुक्रवारी दिवसभर वनविभागाने  महिम राबवून शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. रासायनिक  कंपन्यांमुळे या परिसरातील उग्रवासामुळे बिबटय़ाने स्थलांतर केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवीन ठाणे अशी ओळख असणाऱ्या घोडबंदर रोड परिसरात शेजारील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे अधूनमधून भरवस्तीत शिरतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाप्रमाणेच कर्जत, अंबरनाथ आणि पनवेल तालुक्याच्या हद्दीत माथेरान आणि श्रीमलंग डोंगररांगांमध्ये मोठय़ा प्रमाणात जंगलसंपदा आहे. या भागात बिबटय़ासह अन्य वन्यप्राणीही आहेत. ते प्राणी मानवी वस्तीत येत असावेत, असा अंदाज वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत.

नवी मुंबई परिसरात तळोजा ही एक मोठी औद्योगिक वसाहत आहे. याच वसाहतीतील एका कंपनीत बिबटय़ा फिरत असल्याचे दिसले. कंपनीच्या सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये बिबटय़ा फिरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तळोजा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पेणधर गावाशेजारील कोलटेन कंपनीच्या आवारात संरक्षक भिंतीवरून उडी मारून बिबटय़ा शिरला. गेल्या सोमवारच्या (१९ नोव्हेंबर) कंपनीतील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ते दिसून आले आहे.

शुक्रवारीतळोजा औद्य्ोगिक वसाहतीत वनविभागाचे सात  ते आठ जणांच पथक सकाळी दाखल झाल होते. रात्र होईपर्यंत त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र बिबटय़ा आढळला नाही. शनिवारी सकाळी सहा वाजता वनविभागामार्फत  १५ ते १६ एकरच्या परिसरात पुन्हा शोध घेतला जाणार आहे. यावेळी झोनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत पिंजराही आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसणारा प्राणी बिबटय़ाच आहे. याठिकाणी लोकांची सतत वर्दळ असल्याने बिबटय़ा फार काळ राहणार नाही. तरीही आम्ही शोध घेत आहोत. परिसरातील नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्ञानेश्वर सोनवणे, रेंज झोन अधिकारी वन विभाग

सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीच्या खात्री साठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले. नीट निरीक्षण केले असता तो प्राणी बिबटय़ाच असल्याचे स्पष्ट झाले. आम्ही या बाबतीत तातडीने वन विभागाला कळविले आहे.

– विलास मोरे, व्यवस्थापक, कोलटेन कंपनी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2018 1:41 am

Web Title: a search of the leopard all day long in the place
Next Stories
1 घणसोलीतील सेंट्रल पार्क उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
2 अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरीला फटका
3 कळंबोलीत सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण
Just Now!
X