चार जणांना अटक; २० लाखांचा ऐवज जप्त

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणानंतर नवी मुंबईत सोनसाखळी व वाहन चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. पोलिसांनी या प्रकरणांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर सोनसाखळी चोरी करणारी टोळी गजाआड केली आहे. त्यांच्याकडून शहरातील २० गुन्हे उघडकीस आले असून २० लाखांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे.

टोळीतील मुख्य आरोपीला तर पोलिसांनी चालत्या रेल्वेतून अटक केली आहे. तन्वीर ऊर्फ दीपक मोहम्मद इब्राहम शेख, अखिल शफिक खान, तशरुभ बेइदुर शेख ऊर्फ राजा आणि हारून लाला सय्यद अशी अटक आरोपींची नावे आहेत.

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर साखळी चोरी आणि वाहन चोरीचे वाढते प्रमाण पाहता आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी अप्पर पोलीस आयुक्त बी.जी. शेखर आणि गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रवीण कुमार यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी या चोरी प्रकरणांवर लक्ष केंद्रित केले होते. त्या अनुषंगाने तांत्रिक तपासाअंती एक टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तपासाची दिशा ठरली व पोलिसांनी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींवर पाळत ठेवली. पोलीस हवालदार सुनील साळुंखे यांना टोळीचा सूत्रधार तन्वीर ऊर्फ दीपक हा कोलकाता येथे पळून जात असल्याची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी झाडखंड व ओरिसा पोलिसांच्या मदतीने धावत्या रेल्वेमधून त्याला अटक केली.  आरोपी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात येताच त्याने इतर साथीदारांविषयी माहिती दिली. त्यानुसार सर्वाना अटक करण्यात आली. चौकशी केल्यानंतर २० लाखांचे दागिने जप्त केले.

रबाळे ५ गुन्हे

कामोठे : ३,  रबाळे : ५, सानपाडा : २, एन आर आय : ३, खारघर : ३, नेरुळ :१, वाशी : १, खांदेश्वर : १, कळंबोली १.