नवी मुंबई, पनवेलमधील चित्र; बंदीची भीती कमी; कचराभूमीत मोठय़ा प्रमाणात पिशव्या

नवी मुंबई शहरात आता पुन्हा बिनदिक्कत प्लास्टिकचा मुक्त वापर सुरू झाला आहे. यात सर्वाधिक वापर फेरीवाल्यांकडून होत असून स्वीट मार्टपासून किरकोळ विक्रेते प्लास्टिकमध्ये वस्तू देत आहेत. त्यामुळे कचऱ्यातून गायब झालेले प्लास्टिक पुन्हा दिसू लागले आहे. प्लास्टिक बंदीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी केली. मात्र काही महिन्यांत निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. मात्र तरीही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कायम आहे. प्लास्टिक बंदीची पालिका क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत होती. पालिकेने केलेल्या कारवाईत दंड म्हणून वर्षभरात ३५ लाखांची वसुली करण्यात आली होती.

आताही पालिका थेट कारवाई करत आहे, तरीही कचऱ्यात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्या आढळून येत आहेत. बुधवारी वाशी येथे तर गुरुवारी तुर्भे भागात पालिकेने कारवाई करीत सुमारे ५० हजारांचा दंड आकारणी करण्यात आली असून यात दुकानदारांचा समावेश होतो. या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांत भाजी विक्रेत्यांचा मोठा सहभाग दिसत आहे. तसेच फेरीवाल्यांकडूनही पिशव्या दिल्या जात आहेत.

या संदर्भात काही विक्रेत्यांना विचारले असता, पिशवी दिली नाही तर ग्राहक जे पिशवी देतील त्यांच्याकडून माल घेतात. त्यामुळे आम्ही पिशव्या ठेवतो असे सांगितले.

नियमीत कारवाईनंतरही बंदी निष्प्रभ

पनवेल : राज्य सरकारने प्लास्टिकबंदी लागू करून आठ महिन्यांचा कालावधी झाला तरी मात्र पनवेल परिसरात काही ठिकाणी चोरटय़ा, तर काही ठिकाणी खुलेआम प्लास्टिक  वापर सुरू आहे. नियमित होणाऱ्या कारवाईवरूनच हे दिसून येते.

प्लास्टिकबंदीची घोषणा झाल्यानंतर पालिका क्षेत्रात काही दिवस कडक अंमलबजावणी झाली होती. सरकारने ५० मायक्रॉनवरील प्लास्टिक पिशव्यांना काही अटींवर परवानगी दिली; पण याचा चुकीचा अर्थ लावत व्यापारी, विक्रेत्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री सुरू केली आहे. किराणा दुकानदार कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांमधून धान्य, मसाले यांची विक्री करत आहेत. शहरातील मार्केट यार्ड, टपालनाका, शिवाजी महाराज पुतळा, रायगड बाजार, उरण नाका खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, तळोजा तसेच पनवेल ग्रामीण भागात व भाजी मंडईत प्लास्टिक पिशव्यांचा वापर  केला जात आहे. उरण नाका, मुस्लीम मोहल्ला, कच्छी मोहल्ला येथे मटण व मासळी बाजारात  प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. पनवेल पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला असतानाही वापर सुरू आहे.

केवळ व्यावसायिकांवर नव्हे तर ते प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या ग्राहकांवरही दंड आकारणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तसा नियमही आहे. तरच याची काटेकोर अंमलबजावणी होईल.

– निखिल परदेशी, रहिवासी, कोपरखैरणे

प्लास्टिकचा वापर वाढला असल्याचे आमच्याही निदर्शनास येत आहे. यामुळे आता कारवाईचा वेग वाढवला आहे. बुधवार आणि गुरुवारीही वाशी आणि तुर्भे येथे कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत सातत्य ठेवले जाईल.

– शिरीष पवार, उपायुक्त घनकचरा

प्लास्टिकबंदीनंतर दररोज कारवाई सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईत ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिकचा  वापर करतील तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल.

– संध्या बावनकुळे, उपायुक्त पनवेल मनपा