वातावरणातील बदलाचा परिणाम उरणमधील आंबा पिकांवरही होऊ लागला आहे. त्यामुळे यावर्षी उरणमधील आंबा उत्पादनात २० टक्के पेक्षा अधिकची घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे. हापूसचा आंबा आणि कोकण हे समीकरण कायम असले तरी कोकणात मोडणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील हापूस आंबा तसा प्रसिद्ध नाही. मात्र काही वर्षांपासून रायगडमधील अलिबागमध्ये रायगडच्या हापूसलाही ओळख देण्याचा प्रयत्न आंबा उत्पादकांकडून केला जात आहे. त्याच वेळी उरणचा दुर्गम भागात असलेल्या रानसई परिसरात एका बडय़ा शेतकऱ्याने १३५ हेक्टरपेक्षा अधिक जागेत आंब्याची लागवड केलेली आहे. तसेच चिरनेर, कळंबुसरे, दिघोडे, वेश्वी, कोप्रोली, सारडे, वशेणी, केगाव, नागाव, चाणजे, शेवा आदी गावांच्या क्षेत्रातही शेतकऱ्यांनी आंब्याची लागवड केली जात आहे. उरण तालुक्यात एकूण १६५ हेक्टरी जमिनीवर आंबा लागवड केली जात आहे. यात दरवर्षी १५ ते २० हेक्टर क्षेत्राची वाढ होत असल्याची माहिती उरणचे कृषी अधिकारी के. एस. वेसावे यांनी दिली. त्याचप्रमाणे आंबा पिकावरील कीड तसेच इतर रोगांसंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला जात असून त्यासाठी कृषी विभागाकडून हॉटस्अ‍ॅपचाही वापर करीत आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आंब्या संदर्भात माहिती पुरविली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आंबा उत्पादनाचा कल वाढू लागला आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून रात्रीचे थंड वातावरण व त्यामुळे पडणारे दव, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण याचा परिणाम आंबा पिकावर होऊ लागला आहे. त्यामुळे यावर्षीच्या आंबा उत्पादनात उरण तालुक्यात वीस टक्केपेक्षा अधिकची घट होण्याची शक्यता वेसावे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.