आतापर्यंत ९० कोटींचा खर्च ; कामात घोटाळा झाल्याची चर्चा

नवी मुंबई : दोन विद्युत खांबांच्या दरम्यान लोंबकळणाऱ्याशहरातील सर्वच विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या दहा वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या ५२ कोटी खर्चाच्या कामात गौडबंगाल झाल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात होऊ लागली आहे. ऐरोली सेक्टर सहा येथे एका लहान मुलाचा दोन दिवसांपूर्वी झालेल्या मृत्यूने हा घोटाळा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या या कामात जास्तीची देयके वसूल करण्यात आली असून ५२ कोटीचे हे काम नंतर टप्प्याटप्प्याने पुढे ९० कोटींपर्यंत वाढविण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे. शहरातील सर्वच विद्युत वाहिन्या या भूमिगत झाल्या असत्या तर त्या निष्पाप मुलाचे प्राण वाचले असते अशी भावना व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई पालिकेचा प्रवास हा थेट ग्रामपंचायतीमधून पालिकेत झालेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक सेवा सुविधा या भागाला पुरविल्या जात होत्या. सिडकोही काही प्रमाणात सुविधा देत होती. यात विद्युत वाहिन्यांचे जाळे सर्वत्र पसरलेले होते. एका विद्युत खांबावरून दुसऱ्याखांबावर जाणाऱ्याया वहिन्या अनेक ठिकाणी लोंबकळत होत्या तर काही ठिकाणी या विद्युत वाहिन्याचे घरटे झाले होते. त्यामुळे शहरातील सर्वच विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात असा एक प्रस्ताव दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. त्यासाठी महावितरणबरोबर चर्चा करुन ५२ कोटी रुपये खर्चाची एक निविदा काढण्यात आली होती.

दिव्यापासून दिवाळ्यापर्यंत भूमिगत होणाऱ्याया वाहिन्यांचे तीनशे ते चारशे किलोमीटर अंतर झाले होते. सर्व स्थानिक नगरसेवकांना लक्ष्मी दर्शन केल्यानंतर हा कामाचा खर्च वाढविण्यात आला. यात एक मीटर भूमिगत करण्यात आलेल्या वाहिनीचे दोन मीटर अंतर दाखवून देयके काढण्यात आली होती. त्याचप्रमाणे यासाठी निकृष्ट दर्जाचे विद्युत साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

या कामात कंत्राटदाराने चांगभलं झाल्याने अधिकारी वर्गानेही आपले उखळ पांढरे करून घेतले होते. त्यामुळे हे काम नंतर कोट्यवधी रकमेने वाढविण्यात आले. तरीही या शहरातील सर्वच विद्युत वाहिन्या या भूमिगत झालेल्या नाहीत हे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका लहान मुलाच्या दुर्घटनेने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या भूमिगत विद्युत वाहिन्या घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

ऐरोलीत घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. त्याची चौकशी केली जात आहे. शहरातील सर्वच विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामात काही वाहिन्या या भूमिगत करण्याचे काम राहून गेले होते. त्याची माहिती उद्यापर्यंत दिली जाईल. -सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका