न्यायालयाच्या आदेशामुळे खारफुटीचा अडथळा दूर

नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला पर्याय ठरू पाहणाऱ्या कोपरखैरणे ते ऐरोली या पाच किलोमीटर लांबीच्या पाम बीच मार्गाच्या विस्तारातील अडथळा मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे दूर झाला आहे. विशेष म्हणजे सिडकोच्या अखत्यारीत असलेला हा विस्तार करण्याची तयारी नवी मुंबई पालिकेने अलीकडे दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच खारफुटीमुळे रखडलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण होऊन ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास हातभार लागणार आहे.

पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे आहेच, पण त्यासाठी जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांना खो घालणे योग्य नाही, असे मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील दोन राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणातील अडथळे दूर झाले आहेत. हाच निकष नवी मुंबईत अन्य दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना लागू होणार असून सिडको व नवी मुंबई पालिकेच्या अखत्यारीतील हे प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक आणि शहरातील अंतर्गत वाहनांच्या गर्दीला पर्याय ठरू पाहणाऱ्या ११ किलोमीटर लांबीच्या पाम बीच मार्गाचा कोपरखैरणे ते ऐरोलीदरम्यान विस्तार करण्याचा निर्णय सिडकोने आठ वर्षांपूर्वी घेतला. त्या दृष्टीने कोपरखैरणे येथे घणसोली नोड सुरू होणाऱ्या चौकापासून हा रस्ता बांधण्यात आला. तो थेट ऐरोली येथील मुलुंड खाडी पुलाजवळ जोडण्यात आला आहे. या मार्गाच्या उभारणीत घणसोली येथील  दीड किलोमीटर अंतरातील खारफुटी जंगलाची अडचण आली आणि तो आठ वर्षे रखडला. सिडकोचा या ठिकाणी एक छोटा पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रकल्प आता सिडकोने नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरित केला आहे. वाशी ते बेलापूर या ११ किलोमीटरच्या मार्गाचे हस्तांतर यापूर्वीच पालिकेला झाल्याने सिडकोने त्याचा एक भाग असलेला हा पाच किलोमीटर लांबीचा मार्गदेखील पालिकेला देऊन टाकला आहे. नवी मुंबई पालिका महाराष्ट्र सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घेतल्यानंतर लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

शीव-पनवेल महामार्गावर कामोठे येथे अशाच प्रकारे एक किलोमीटर अंतराचा रस्ता खारफुटीमुळे रखडला आहे. त्यामुळे रहिवाशी क्षेत्रात राहणाऱ्यांना शीव-पनवेल मार्गावर ये-जा करताना खूप त्रास सहन करावा लागतो. या मार्गालाही आता सिडको लवकरच एमसीझेडएची परवानगी घेणार असल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले.

उरण-नेरुळ रेल्वे प्रकल्पात चार किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गात खारफुटी व भूसंपादन हे दोन प्रश्न प्रलंबित असून रेल्वे प्रकल्पांना खारफुटी ही अडथळा ठरत नसल्याने हा प्रकल्प केवळ भूसंपादनाच्या प्रश्नावर रखडला आहे.

– डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको