अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी
जेएनपीटी बंदराची निर्मिती होऊन गुरुवारी २७ वर्षे पूर्ण होत असून या बंदरात आयात-निर्यातीसाठी ये-जा करणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीच्या नियोजनशून्यतेमुळे येथील नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारी हलकी वाहने व दुचाकींना अपघात होऊन त्यात शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. याविरोधात उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील व त्यांचे सहकारी बंदराच्या २६ मेच्या स्थापना दिनापासून बेमुदत उपोषण करणार आहेत.
सुरुवातीला जेएनपीटी बंदरातील कंटेनर हाताळणीची क्षमता एक लाख होती. ती वाढून सध्या ४५ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे कंटेनर वाहून नेणाऱ्या जड वाहनांची रोजची संख्याही १० हजारांवरून ६० हजारांवर पोहोचली आहे. त्या तुलनेत वाहनांसाठी चार पदरीच रस्ते असल्याने उरण, पनवेलमधील नागरिकांना या रस्त्यावरील या जड वाहनांचा सामना करीत प्रवास करावा लागतो. तसेच अप्रशिक्षित चालक, वाहनांना धोक्याचा इशारा देणाऱ्या रिफ्लेक्टरचा अभाव, रस्त्यावर जड वाहनांची बेकायदा पार्किंग, दुभाजक तोडून होणारी बेकायदा वाहतूक, त्यामुळे होणारी कोंडी, सूचना फलकांचा अभाव यामुळे अपघातात वाढ झाली आहे.
याबाबत वारंवार निदर्शने, मोर्चे व आंदोलने केल्यानंतर काही वर्षांपूर्वी जेएनपीटी, सिडको, वाहतूक व रस्ते विभाग यांची राज्याच्या मुख्य सचिवांनी बैठक घेऊन अपघात टाळण्यासाठी काही सूचना केलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यात दुचाकी व हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका, अपघातग्रस्तांवर त्वरित उपचार करता यावेत यासाठी सुसज्ज रुग्णालय, अपघातग्रस्ताचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक साहाय्य आदी सूचना करण्यात आलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.