एमआयडीसीच्या जलवाहिनीतून गळती
दिघा येथील रामनगर ते विष्णुनगर रस्त्याच्या वळणावर सॅन्डोज कंपनीजवळ एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी गटारात वाहून जात आहे. हा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू असून एमआयडीसीच्या आधिकांऱ्याचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
या जलवाहिनीतून पाण्याची चोरी होत असल्याने एमआयडीसीने तेथे सिमेंट काँक्रीटचे आवरण घातले आहे. मात्र आता हे सिमेंट निघाल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. या जलवाहिनीतून शहरातील एमआयडीसी परिसरातील कंपन्या तसेच औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. याच ठिकाणी सॅन्डोज कंपनीजवळ शटल पंप आहे. वाया गेलेले हे पाणी सॅन्डोज कंपनीच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ येथे साचून राहते. या साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया तसेच डेंग्यूच्या अळ्यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.
या संदर्भात एमआयडसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब मान्य केली. एमआयडसीने शट-डाउन न घेतल्यामुळे ही गळती थांबवता आलेली नाही. हे काम करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागेल. जलवाहिनी बंद केल्यास लाखो नागरिकांचा पाणीपुरवठा बंद होईल. मात्र येत्या आठवडाभरामध्ये शट-डाउन घेऊन ही गळती बंद करण्यात येईल, असे ते म्हणाले.