करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. लॉकडाउमध्ये धार्मिक स्थळंही बंद करण्यात आली होती. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळं बंद आहेत. देश अनलॉक होऊ लागल्यानंतर मंदिरही उघडी होत आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरं तुर्तास बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळं उघडण्यासाठी राज्यात सातत्यानं मागणी होत आहे. अनेक राज्यांनी धार्मिक स्थळं उघडली पण महाराष्ट्रात धार्मिक स्थळं का उघडली जात नाहीयेत असा सवालही विरोधकांकडून करण्यात आला होता. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसेनं पनवेलमध्ये टाळं तोडून मंदिर उघडलं आहे. त्यानंतर मनसेकडून महाआरतीही करण्यात आली. मॉल उघडले मग मंदिर बंद का? असा सवाल पनवेल मनसेच्या वतीने यावेळी विचारण्यात आला.

मनसेच्या पनवेल येथील कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं. येथील विरुपक्ष मंदिर मनेसेनं टाळे ताडून उघडलं. राज्यातील मंदिर उघडी करण्यासाठी मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, पनवेल शहर पोलिसांनी सर्व आंदोलकाना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, राज्यातील मंदिरं दर्शनासाठी उघडावीत, अशी मागणी अनेक राजकीय पक्षाने केली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथे आंदोलन केले होते. शिवया भाजपनेही मंदिरं खुली करण्याची मागणी करत, राज्यभर आंदोलन केलं होतं.