‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत बुधवारपासून शहरातील मॉल सुरू झाले. मात्र, करोना संसर्ग रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने बुधवारी काढलेल्या नव्या आदेशानुसार शहरातील मॉल, मल्टिप्लेक्स चित्रगृह, रेस्तराँ, तसेच फूड कोर्ट ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

५ ऑगस्ट रोजी मॉल सुरू झाल्यानंतर काही ग्राहक गुरुवारी सकाळी ११ नंतर मॉलमध्ये खरेदासाठी आले होते. मात्र, त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मॉल बंद ठेवण्यात येणार असल्याचे सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. पालिकेने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे मॉल व्यवस्थापनानेही नाराजी व्यक्त केली आहे.

साडेचार महिन्यांच्या कालावधीनंतर शहरातील मॉल सुरू होणार असल्याने मॉल व्यवस्थापनाने अंतर नियम पाळण्याबरोबरच ग्राहकांच्या आरोग्याची खबरदारी घेतली होती. बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने मॉल उघडण्याच्या पहिल्याच दिवशी तुरळक संख्येने ग्राहक आले होते. त्यामुळे वातावरणात तितकासा उत्साह जाणवला नाही. त्यातच बुधवारी सायंकाळी उशिरा नवी मुंबई पालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी केलेली सारी तयारी वाया गेल्याची भावना काहींनी व्यक्त केली.

संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ामध्ये फक्त नवी मुंबईत मॉल सुरू करण्यात आले होते. परंतु शहरातील मॉलमध्ये शहराबाहेरील येणाऱ्यांची संख्या, अंतर निमय पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने करोनावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात मॉलमधील गर्दी बाधा ठरू नये म्हणून मॉल, चित्रपटगृहे, हॉटेल्स, फुड मॉल ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई शहरात ५ ऑगस्ट रोजी मॉल सुरू झाले. पहिल्याच दिवशी सीवूडस येथील ‘ग्रॅण्ड सेन्ट्रल’ मॉलबाहेर ग्राहकांची गर्दी होती. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवले जात नसल्याने आयुक्तांची ३१ ऑगस्टपर्यंत मॉल बंद ठेवण्याच्या आदेशाची प्रत मॉल व्यवस्थापनाला देण्यात आली होती.

– शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापूर