ऐरोली-काटई मुक्तमार्गाचे भूमिपूजन

ऐरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी भूमिपूजन करण्यात आलेल्या ऐरोली-कल्याण दरम्यानच्या काटई नाका येथील १२ किलोमीटरच्या उन्नत व भुयारी मार्गामुळे पारसिक डोंगरामुळे दोन भागांत विभागली गेलेली कल्याण डोंबविली, बदलापूर, अंबरनाथ ही शहरे मुंबई, नवी मुंबईच्या अधिक जवळ येणार आहेत. सिमेन्स व भारत बिजली कंपनीच्या जमीन संपादनाचा तिढा सुटल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. येत्या चार वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येईल, असा दावा करण्यात आला आहे. या भुयारी मार्गावर एमएमआरडीए तब्बल ९४४ कोटी रुपये खर्च करणार आहेत.

पूर्वेस असलेल्या कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ या शहरांतील नागरिकांना मुंबई गाठताना शिळफाटा अथवा भिवंडी मार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या मुक्त मार्गामुळे सुटणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यातील ऐरोली ते कटई नाका या उन्नत व भुयारी मार्गाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. हा मार्ग मुलुंड-ऐरोली खाडी पुलाला २.२ किलोमीटरच्या उन्नत मार्गाने जोडण्यात येणार आहे. सिमेन्स व भारत बिजली कंपनीच्या मागे असलेल्या पारसिक डोंगराला कापून हा मार्ग जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसीकडून भाडेपट्टा करारावर सिमेन्स व भारत बिजली कंपनीला देण्यात येणारी जमीन संपादित केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन पावसाळ्यानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

तीन टप्प्यांत हा मार्ग पूर्ण केला जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा या चार किलोमीटरचा असून तो ठाणे-बेलापूर ते मुंब्रा-पुणे मार्गातील आहे. या मार्गात १.७ किलोमीटर लांबीच्या पारसिक डोंगरातून बोगदा काढला जाणार आहे.

या कामाची निविदा काढण्यात आली असून जामीन संपादन झाल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिळफाटा मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा अर्धा तास वाचणार आहे. चार किलोमीटरचे अंतर कमी होणार असल्याने ठाणे-बेलापूर मार्गाने प्रवास करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली, बदलापूर-अंबरनाथला जाताना करावा लागणारा द्राविडी प्राणायम वाचणार आहे.