वर्षभरात आठ विविध मार्गावर बससेवा; रिक्षाचालकांकडून पिळवणूक सुरुच

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेने (एनएमएमटी) पनवेल तालुक्यामधील शहर ते रेल्वेस्थानके हा पल्ला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागांत बससेवेचा विस्तार करण्याची गरज व्यक्त होत आहे. पनवेल रेल्वेस्थानक ते पळस्पे आणि नेरे या दोन मार्गावरील सामान्य प्रवाशांनी त्यांचाही प्रवास सोयीचा आणि माफक दरात व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी एनएमएमटीने ५६ आणि ५७ क्रमांकाच्या बससेवा सुरू केल्यानंतर पनवेल शहरात ऑक्टोबरमध्ये ७५ क्रमांकाची बस सुरू केली. त्यानंतर तळोजा पाचनंदनगर आणि खारघर व्हॅलीशिल्प येथे बससेवा यंदाच सुरू केली. मार्च महिन्यात तळोजा औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी ७१ क्रमांकाची बससेवा सुरू करून कामगारांसाठी हक्काची बस दिली. मागील आठवडय़ात पनवेल रेल्वेस्थानक ते करंजाडे वसाहत आणि रोडपाली ते खारघर या नवीन बससेवा सुरू केल्या. एनएमएमटीने पनवेलच्या सामान्य प्रवाशांच्या हितासाठी वर्षभरात आठ विविध मार्गावर बससेवा सुरू केली.

तरीही प्रवाशांची पिळवणूक संपलेली नाही. या भागांत सार्वजनिक बससेवा नसल्याने तीन आसनी रिक्षाचालकांचे मनमानी भाडे आकारणे सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना एनएमएमटीच्या सेवेची येथे अपेक्षा आहे. पनवेलच्या पूर्व भागातील नेरे गावापर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरु आहे. मात्र ही बससेवा एक ते दोन तासांनी सुटणारी व अनिश्चित काळाची असल्याने येथील प्रवाशांनी सहा आसनी रिक्षांमध्ये स्वत:ला कोंबून प्रवास करावा लागत आहे.

नेरे येथील महालक्ष्मी नगर ते पनवेल रेल्वेस्थानक (पूर्व) नवीन पनवेल बाजूकडील मार्गावर ही बससेवा सुरू करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बससेवेमुळे आदई, सुकापूर, आकुर्ली, चिपळे, नेरे आणि वाजेपूर या गावांमधील ग्रामस्थांना त्यांचा मोठा लाभ होईल. तसेच या परिसरात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभारली आहेत. त्यामध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना या बससेवेमुळे मुंबईहून घर गाठण्यासाठीचा रात्रीचा प्रवास करता येईल.