रात्री उशिरा परतणाऱ्या नोकरदारांचा जीव मुठीत
उरण शहरात सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. रात्री तसेच मध्यरात्री रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या दिशेने भटकी कुत्री धावून जात आहेत. त्यामुळे कार्यालयातून रात्री उशिरा परतणारे नोकरदार जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालत आहेत. तालुक्यात महिन्याला सरासरी १२५ जणांना भटके आणि पिसाळलेले कुत्रे चावत असल्याच्या घटना घडल्या आहेत. श्वानदंश झाल्यास वा कुत्र्यांमधील रेबीज रोग टाळण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिबंध लस दोन महिन्यांपासून नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर नगरपालिका कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना हाती घेत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उरणच्या ग्रामीण रुग्णालयात नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध आहेत, असल्याची माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बद्रे यांनी दिली. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात न आल्याने कुत्र्यांची संख्या वाढली आहे. धावत्या दुचाकीच्या दिशेने ही कुत्री धावतात. त्यामुळे दुचाकीस्वाराचे लक्ष विचलित होऊन अपघात होतात.
धोकादायक ठिकाणे
मोरा, कोटनाका, आनंदनगर, कामठा, पेन्शनर्स पार्क, बोरी परिसर.
उरण तालुक्यात दोन वर्षांपासून कुत्र्यांना प्रतिबंधक लसी (व्हॅक्सीन) देण्यात आलेल्या नाहीत. त्याच प्रमाणे तालुक्यातील कुत्र्यांचे निर्बिजीकरणही करण्यात आलेले नाही. निर्बिजीकरण शस्त्रक्रियाही बंद झाली आहे.
-डॉ. डी. जी. जाधव, उरण पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी