हापूसप्रेमींची निराशा; थंड हवामानाचा फटका ; आंब्याच्या देठावर दव पडल्याचा परिणाम

कोकणातल्या आमराईत तयार झालेला अवीट गोडीचा फळांचा राजा यंदा मुंबईत लवकर दाखल झाल्याने त्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे मालाला उठाव आहे, मात्र सध्या खराब माल येत आहे. एका पेटीत अर्धा माल देठाला काळवंडलेला निघत आहे. त्यामुळे हापूसप्रेमींची निराशा होत आहे. थंड हवामानाचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

‘एपीएमसी’मध्ये रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्य़ांतून हापूसची आवक होते. यंदा देवगड हापूसच्या ६०० पेटय़ा जानेवारीतच दाखल झाल्या होत्या. त्यामुळे हंगामाअगोदरच हापूसची आवक सुरू झाली होती. आंब्यासाठी उष्ण-दमट हवामान उपयुक्त असते. परंतु यंदा कडाक्याच्या थंडीचा मुक्काम वाढल्याने फळांची वाढ खुंटली आहे. बाजारात येणाऱ्या आंब्यापैकी ४० टक्के फळे आकाराने लहान येत आहेत. लहान आकाराच्या फळांबरोबर आता खराब मालही येऊ लागला आहे.

एपीएमसीच्या घाऊक बाजारात हापूसच्या शनिवारी १५००, सोमवारी २ हजार आणि मंगळवारी ११०० पेटय़ा दाखल झोल्या आहेत. मात्र हवामान बदलत असून तापमानाचा पारा खाली येत असल्याने त्याचा परिणाम हापूसच्या दर्जा गुणवत्तेवर होताना दिसत आहे. थंड वातावरणाने काही भागात दव पडले आहेत. हे दव आंब्याच्या देठावर पडले असल्याने आंबे देठावर काळवंडत आहेत.

सध्या बाजारात हापूसचे बाजारभावही आवाक्यात आहेत. ४ ते ६ डझन पेटीला १५०० ते ४ हजार रुपये बाजारभाव आहेत. यामुळे ग्राहक हापूस खरेदी करीत आहेत. मात्र खरेदी केल्यानंतर चार ते सहा डझनच्या पेटीत दीड ते दोन डझन आंबे देठाला खराब निघत असल्याच्या तक्रारी ग्राहक करीत असल्याची माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे.

४० टक्के माल खराब

गेल्या वर्षी हापूसला ‘अंथरॉक्स’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आवक घटली होती. हंगाम उशिरा सुरू झाला होता. यंदा हापूसचा हंगाम लवकर सुरू झाला असून आवकही मोठी आहे. मात्र थंडीने ३५ ते ४० टक्के हापूस खराब निघत आहे.

बाजारातून हापूस आंब्याची पेटी खरेदीनंतर आंबा तयार होण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. चौथ्या दिवशी पेटी उघडली असता, ६ डझनांत बरेच आंबे देठाला काळे पडलेले असतात.

– सतीश देसले, ग्राहक