सर्वाधिक रुग्णसंख्या पनवेलमध्ये; एक कोटीची प्रयोगशाळा अलिबागमध्ये

पनवेल : एक कोटी सात लाख रुपये खर्चाची आरटी पीसीआर ही महत्त्वाची प्रयोगशाळा अलिबाग येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना राज्य शासनाच्या एकाही बडय़ा अधिकाऱ्याला करोनाकाळातील स्थितीचा विचार करण्यास वेळ मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्ह्य़ात करोनाचा सर्वाधिक प्रसार हा पनवेल आणि उरण या तालुक्यांत झाला आहे. दोन्ही तालुक्यांतील रुग्णसंख्या ४८०४ इतकी आहे, तर मृतांची संख्या १२७ झाली आहे. त्यामुळे येथील रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी अडीच तास लागून ७० किलोमीटरचा प्रवास करून अलिबाग येथे पाठविण्यात येणार आहेत.

मात्र, रायगड जिल्ह्य़ातील ८५ टक्के बाधित पनवेल आणि उरण तालुक्यातील आहेत. अशा परिस्थितीत प्रतिबंधित क्षेत्राजवळ प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्य़ातील १६ तालुक्यांतील बाधितांची संख्या आठ हजारांवर पोहोचली आहे. यात दोन तालुक्यांतील रुग्ण ४८०४ इतकी आहे. या दोन तालुक्यांतील संसर्गामुळे मृतांची संख्या १२७ झाली आहे.

सध्या पनवेल आणि उरण येथील नागरिकांची करोना आरटी पीसीआर चाचणी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाच्या खासगी प्रयोगशाळेतून केली जात आहे. मात्र, येथील उपजिल्हा रुग्णालयाला जिल्ह्य़ाचा पहिला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला होता.

राजकीय प्रभावाचा वापर?

जिल्हाधिकारी, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मागणीमुळे जिल्ह्य़ाचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे प्रयोगशाळा उभारणीचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव किरण वाहुल यांनी काढले आहेत. पनवेल ते अलिबाग हे अंतर ७० किलोमीटर आहे. येथे चाचणीचे नमुने पाठविण्यासाठी वाहनाने अडीच तासांचा कालावधी लागतो. ज्या ठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या आणि बाधितांची संख्या जास्त असताना पनवेल या ठिकाणी आरटी पीसीआर प्रयोगशाळा उभारण्यात येणार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्य सरकारमध्ये राजकीय प्रभाव कायम टिकवून असलेल्या काही नेत्यांनी करोना प्रयोगशाळा अलिबागमध्ये उभारण्याचा आग्रह धरल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.