विकास महाडिक

केवळ खारफुटी जंगलामुळे गेली बारा वर्षे रखडलेल्या घणसोली ते ऐरोली या पामबीच विस्तार मार्गाचे काम येत्या काळात सुरू होणार आहे. कांदळवन विभागाने महाराष्ट्र सागरी मार्गे प्राधिकरणाकडे ना हरकत प्रमााणपत्र दाखल केले आहे. त्यामुळे सागरी नियंत्रण कायद्या, महाराष्ट्र सागरी क्षेत्र प्रधिकरण, आणि पर्यावरण विभागाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर या प्रकल्पाला पालिका सुरुवात करणार आहे.

यापूर्वी घणसोली ते ऐरोली सेक्टर दहापर्यंत मर्यादित असलेल्या या मार्गाची आणखी तीस मीटर लांबी वाढविण्यात आली असून हा मार्ग मुलुंड काटई या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुणे, गोवा, प्रस्तावित विमानतळ आणि जेएनपीटी बंदराकडे जाणारे वाहनचालक या पर्यायी मार्गाचा वापर करू शकणार असल्याने ठाणे बेलापूर या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार आहे. मुलुंड काटई मार्गाला हा रस्ता जोडल्याने आता यासाठी लागणाऱ्या परवानगी लवकर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईतील वाहतूक कोंडी आता एक समस्या निर्माण झाली आहे. ठाणे बेलापूर व शीव पनवेल, महापे शिळफाटा या वर्दळीच्या रस्तामुळे नवी मुंबईतील अंतर्गत वाहतुकीचा विनाकारण खोळंबा होत आहे. सकाळ संध्याकाळ आणि पावसाळ्यात येथील वाहतूक कोंडी हा नित्याचा भाग झाला आहे. यासाठी पालिका प्रशासनाच्या आग्रहास्तव ठाणे-बेलापूर मार्गावर तसेच शीव-पनवेल मार्गावर अकरा उड्डाणपूल बांधण्यात आलेले आहेत. तरीही ही वाहतूक कोंडी फुटलेली नाही. त्यासाठी आता मुलुंड काटई नाका हा एका पारसिक डोंगर पोखरून उभारण्यात येणारा मार्ग हा पर्याय आहे. त्याचे काम प्रगतिपथावर असून या वर्षाअखेर हा मार्ग प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत या शहरांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मुलुंड काटई मार्ग वरदान ठरणार आहे. मात्र पुणे, गोवा, जेएनपीटी आणि नियोजित विमानतळाकडे जलद जाण्यासाठी मार्गाची उभारणी करण्याचे काम पालिका करीत असून वाशी येथे सर्वाधिक लांबीचा कोपरी ते वाशी अरेंजा कॉर्नर हा दोनशे कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. याच मार्गाला समांतर असणारा आणि गेली बारा वर्षे केवळ दोन किलोमीटरच्या खारफुटी जंगलामुळे रखडलेला घणसोली ऐरोली पामबीच मार्गाचा आणखी तीस मिटरने विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी ३७१ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यातील अर्धा खर्च हा सिडको करणार आहे. सिडकोने बेलापूर ते ऐरोली असा २२ किलोमीटर लांबीच्या पामबीच मार्गाचा आराखडा तयार केला होता मात्र हा मार्ग घणसोलीपर्यंत १९ किलोमीटर तयार झाला. त्यानंतर घणसोली ऐरोली खाडी किनाऱ्यालगत लागलेले खारफुटी जंगलाचा अडथळा या प्रकल्पाला अडसर ठरला. मुंबई उच्च न्यायालयाने सुनामीनंतर खारफुटीचे महत्त्व अधोरेखित करून त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शासनाची एक अंग असलेली सिडको हा मार्ग तयार करू शकली नाही. पाच वर्षांपूर्वी हा भाग सिडकोने पालिकेला हस्तांतरित केल्याने या मार्गाची उभारणी करण्याचे आव्हान आता पालिकेसमोर आले आहे. या मार्गामुळे सिडकोच्या ऐरोली व घणसोली भागांतील विक्री योग्य असलेल्या भूखंडांना चांगली किंमत मिळणार असल्याने सिडकोने या मार्गाचा अर्धा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. ऐरोली सेक्टर दहामधील आंतरराष्ट्रीय राजदूत केंद्र प्रकल्प सिडकोने रद्द केल्याने या प्रकल्पाची ३४ हेक्टर जमीन सिडको विकणार आहे. या प्रकल्पापर्यंत मर्यादित असलेला हा २२ किलोमीटर लांबीचा रस्ता आता मुलुंड कटई मार्गाला जोडण्यात येणार असल्याने दक्षिण नवी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या लहान वाहतुकीस पर्याय खुला होणार आहे.

पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या परवानग्या आता या प्रकल्पासाठी लवकर मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पालिकेने मुलुंड कटई मार्गासाठी एमएमआरडीएने नेमलेले आकार अभिनव कन्सल्टंट हे सल्लागार पालिकेने देखील नेमले आहेत. त्यामुळे परवानग्यांचा हा मार्गदेखील लवकरात लवकर मोकळा होणार असून पावसाळ्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

ठाणे -बेलापूर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला हा पामबीच विस्तार मार्ग एक पर्याय ठरणार आहे. केवळ १.९५ किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे हा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे. तो आता मार्गी लावला जाणार असून बहुउद्देशीय मार्ग म्हणून तो आवश्यक आहे. याच मार्गावरून नियोजित विमानतळाकडे जाणारे प्रवाशी वेळेत पोहचू शकणार आहे.

संजय देसाई, शहर अभियंता (प्रभारी) नवी मुंबई पालिका