महापालिकेच्या अभियंता विभागाकडून चाचपणी सुरू

सरळ रेषेत विस्तारलेल्या आणि मर्यादित लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईत अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विजेवर धावणाऱ्या ट्रामचा पर्याय देणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या अभियंता विभागाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात नवी मुंबई हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर ठरले आहे. प्रदूषणामुळे आणि सांस्कृतिक चळवळ, सेवा-रोजगार याअभावी शहराचा पहिला क्रमांक हुकल्याची चर्चा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ही उणीवही दूर करण्यासाठी पालिका पर्याय शोधत आहे.

ब्रिटिश काळात देशात कलकत्त्यात (आताचे कोलकाता) पहिली ट्राम सेवा सुरू करण्यात आली. पुढे ती चेन्नई, मुंबई, नाशिक, कानपूर, कोचीन, पटना आणि सरतेशेवटी भावनगरमध्ये सुरू करण्यात आली. कालांतराने वाहनांची संख्या वाढू लागल्याने रस्ते कमी पडू लागले आणि १९७०पर्यंत देशात कलकत्ता वगळता सर्व ठिकाणच्या ट्राम बंद पडल्या. परदेशांत ही सेवा भारतात येण्यापूर्वीही अस्तित्वात होती आणि आजही वापरात आहे.

नवी मुंबईत ही सेवा सुरू करता येईल का, याची चाचपणी नवी मुंबई पालिकेच्या अभियंता विभागाने सुरू केली आहे. नवी मुंबईत ४५० किलोमीटरचे रस्ते आहेत. पारसिक डोंगर आणि खाडीकिनारा यांच्यामधील भूभाग असलेल्या नवी मुंबईची भौगोलिक रचना ही सरळ रेषेत आहे. ठाणे-बेलापूर व शीव-पनवेल महामार्ग वगळता नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्याच्या कडेला ट्रामसाठी पर्यायी मार्ग तयार करून ही सेवा देण्याचा प्रस्ताव अभियंता विभाग तयार करीत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरही ही सेवा सुरू करणे सोयीचे आहे.

क्षेत्रफळाने मुंबईशी तुलना करणाऱ्या नवी मुंबई शहरात २०-२५ किलोमीटरच्या परिघात ट्राम इलेक्ट्रीक रेल्वे सेवा सुरू करणे शक्य असल्याचे या विभागातील अभियंत्यांचे मत आहे. मुंबई, पुण्यासारख्या गजबलेल्या शहरांत ट्राम सेवा सुरू करणे आता शक्य नाही, पण लोकसंख्येने जेमतेम १४ लाखांच्या घरात असलेल्या नवी मुंबईत ही सेवा सुरू करणे शक्य आहे, असे अभियंत्यांनी सांगितले.

सिडको शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गापासून विमानतळापर्यंत एक सागरी मार्ग तयार करीत आहे. त्यासाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकाही वाशी ते ऐरोली दरम्यान अशाच प्रकारच्या खाडीकिनारा मार्गाचा आराखडा तयार करीत आहे. याशिवाय कोपरखैरणे ते ऐरोली दरम्यानच्या विस्तारित पामबीच मार्गाचे काम पालिका सुरू करणार आहे. या सर्व अंतर्गत मार्गावर विद्युत ट्राम मार्ग तयार करणे शक्य असल्याचे मत पालिकेच्या अभियंता विभागाने तयार केले आहे.

नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर आहे. तिथे ट्राम रेल्वे सेवा सुरू करणे शक्य असून ती काळाची गरज आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. ट्रामचा विचार केला जात आहे, मात्र हे प्रयत्न अतिशय प्राथमिक पातळीवर सुरू आहेत.

– मोहन डगांवकर, शहर अभियंता, नमुंमपा