150 stalls will be the attraction at the Raigad Agricultural Festival ssb 93 | Loksatta

खांदेश्वरमध्ये शहरी ग्राहक शेतकऱ्यांशी जोडले जाणार, रायगड कृषी महोत्सवात दिडशे स्टॉल आकर्षण ठरणार

सूमारे दिडशेहून अधिक स्टॉल या महोत्सवात असणार असून, यामध्ये शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना विक्री करता येणार आहेत. गुरुवारपासून ( ९ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

Raigad Agricultural Festival
खांदेश्वरमध्ये शहरी ग्राहक शेतकऱ्यांशी जोडले जाणार (प्रातिनिधिक छायाचित्र)

पनवेल : रायगड जिल्ह्यातील निम्मे शहरीकरण पनवेल तालुक्यात आहे. जिल्ह्यातील इतर चौदा तालुक्यांमधील कृषी उत्पादने घेणाऱ्या शेतकरीवर्गाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी रायगड कृषी विभागाने यंदाचा पाच दिवसीय कृषी महोत्सव पनवेलमधील खांदेश्वर येथे आयोजित केला आहे. सूमारे दिडशेहून अधिक स्टॉल या महोत्सवात असणार असून, यामध्ये शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना विक्री करता येणार आहेत. गुरुवारपासून ( ९ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

रायगड जिल्हा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी १० लाखांहून अधिक लोकसंख्या पनवेल तालुक्याची आहे. पनवेलमध्ये सर्वाधिक शहरीकरणामुळे येथे मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्ग आहे. शेकडो ग्राहकांना या प्रदर्शनात थेट शेतकऱ्यांकडून विविध प्रकारचा तांदूळ, धान्य, पालेभाजी खरेदी करता येईल. तसेच, सेंद्रीय शेतकरी गटाची शेतमाल येथे घाऊक दराने विक्रीसाठी दालने उभी केली आहेत. ग्राहकांसोबत शेतकरी वर्गासाठी महोत्सवात नवनवीन कृषी तंत्रज्ञानाविषयी परिसंवाद आयोजित केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकच्या कृषी संलग्न योजनांची माहिती या महोत्सवात दिली जाणार आहे.

छायाचित्र – लोकसत्ता टीम

हेही वाचा – नवी मुंबई महापालिकेकडून शून्य कचरा उपक्रम मोहीम, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सातत्य निर्माण करणार

हेही वाचा – नवी मुंबई : प्रेम विवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

यंदाच्या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी आवर्जुन भेट द्यावी. ड्रोनने फवारणीविषयी या महोत्सवात प्रात्याक्षिक दाखविले जाणार आहे. नैनो युरीयाविषयी उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. हायटेक अ‍ॅग्रीकल्चरचे मॉडेल, मायक्रो ठिबक सिंचनाची माहिती, कृषी अवजारे विक्रीची दालने येथे शेतकऱ्यांना अनुभवता येणार आहे. शेतकी अवजारांसाठी महोत्सवात शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्रे घेऊन आल्यास त्याच ठिकाणी त्यांना कर्जासाठी अर्ज करता येईल. दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या दालनात सुधारीत बियानांच्या जाती येथे शेतकऱ्यांना मिळू शकतील. मत्स्यव्यवसायाचे मार्गदर्शन येथे मिळणार आहे. शेतकऱ्यांची सध्याची समस्या त्यांची उत्पादने चांगल्या दरात विक्री करणे ही असल्याने या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक शेतकरी व सेंद्रीय शेतकरी गटांना त्यांचा शेतमाल थेट शहरी ग्राहकांना विक्री करता येणार आहे. ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान असणाऱ्या महोत्सवाचा लाभ ग्राहक व शेतकरी या दोन्ही वर्गांनी घ्यावा, असे आवाहन आहे, असे उज्वला बानखेले (जिल्हा कृषी अधिकारी, रायगड) यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 17:20 IST
Next Story
नवी मुंबई : प्रेम विवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल