एकाच ठिकाणी तीन वर्षे काम केलेल्या १७६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नवी मुंबई पोलीस दलातील वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांची एकच पद्धतीचे काम वर्षांनुवर्षे करण्याची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सूमारे १७६ जणांच्या विभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच वाहतूक पोलीस ठाण्यात तीन वर्षे पूर्ण झालेल्या पोलिसांच्या इतर वाहतूक पोलीस ठाण्यांत बदल्या करण्यात आल्या. सुमारे १७६ जणांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी काढण्यात आल्यामुळे ‘साहेब मला याच पोलीस ठाण्यात ठेवा’ अशी विनवणी करणाऱ्या पोलिसांनी पोलीस आयुक्तांच्या दरबारी रांग लावल्याचे समजते. या सर्व बदल्या नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या आदेशाने वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी केल्या आहेत.

वाहतूक विभागातील १६ पोलीस ठाण्यांमध्ये ४२५ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या पोलिसांना मागील चार-पाच वर्षांपासून टोइंग व्हॅन, नो एन्ट्रीच्या ठिकाणी नेमण्यात आले होते. काही ठरावीक कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्याच कामावर प्रस्थापित झाले होते. आयुक्त नगराळे व उपायुक्त पवार यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी त्यांची वाहतूक विभागातील इतर पोलीस ठाण्यात बदली करण्याचे फर्मान काढल्यामुळे प्रस्थापितांच्या टोळक्याला हादरा बसल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी हाच नियम पाच वर्षांसाठी राबविला जात होता.

या प्रयोगामुळे चिरीमिरीच्या प्रकारांना आळा बसणार असल्याचे सांगितले जाते. कळंबोली, उरण व एपीएमसी या वाहतूक पोलीस ठाण्यांमध्ये कमाईचे मोठे स्रोत असल्यामुळे बदली रद्द करावी, अन्यत्र केल्यास पुन्हा फिरवावी यासाठी अट्टहास करणाऱ्यांनी आयुक्तांवर बडय़ा अधिकाऱ्यांद्वारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात येत आहे. यापूर्वी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पवार यांनी खार पाटील कंन्स्ट्रक्शन कंपनीवर परवानगी न घेता रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे गुन्हा दाखल केला होता. स्थानिक कंत्राटदारांवर कारवाई करणारे उपायुक्त पवार हे वाहतूक विभागातील पहिले अधिकारी आहेत.

बदल्यांसंदर्भात कोणताही दबाव आलेला नाही. तीन वर्षे काळ एकाच वाहतूक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कायदेशीररीत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या बदलीच्या ठिकाणी तातडीने हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवी मुंबईतील वाहतूक नियमन सुरळीत होण्यासाठी पोलीस नेहमीच तत्पर आहेत.

– नितीन पवार, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक विभाग