बेकायदा बांधकामप्रकरणी अपात्र ठरण्याची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेकायदा बांधकामप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन व शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना अपात्र ठरवल्यानंतर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे विविध पक्षांच्या २४ नगरसेवकांवर अपात्रतेचा बडगा उगारणार असल्याचे वृत्त आहे. त्यातील शिवसेनेचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन व भाजपच्या एका नगरसेवकावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

[jwplayer zkvFlBpu]

कोपरखैरणे येथे सिडकोच्या जमिनीवर बेकायदा चाळी उभारल्याप्रकरणी आणि अधिकृत भूखंडाचा गैरवापर केल्याप्रकरणी शिवसेनेचे नवी मुंबई पालिका स्थायी समिती सभापती शिवराम पाटील व त्यांची पत्नी अनिता पाटील यांना पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी अपात्र ठरविले आहे. दिघा बेकायदा बांधकामप्रकरणी नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांना चार महिन्यांपूर्वी अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्याविरोधात त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. पाटील दाम्पत्यही न्यायालयात दाद मागणार आहे. राष्ट्रवादीचे तीन व शिवसेनेचे दोन नगरसेवक अपात्र ठरल्यानंतर आता ऐरोली दिघा परिसरातील जगदीश गवते, आकाश मढवी, बहाद्दूरसिंग बिष्ट, राजू कांबळे या शिवसेनेच्या नगरसेवकांवर बेकायदा बांधकाम प्रकरणी कोणत्याही क्षणी कारवाई केली जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हे तीन नगरसेवक विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे सर्मथक असून चौगुले यांनी मुंढे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तुर्भे येथील नगरसेवक सुरेश कुलकर्णी, माजी मंत्री गणेश नाईक यांचे गाव खैरणे बोनकोडेचे प्रतिनिधित्व करणारे मुनावर पटेल यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घणसोलीतील भाजपचा एकमेव चेहरा असलेल्या उषा पाटील यांच्यावर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

ही कारवाई महाराष्ट्र महापालिका अधिनियम १० (१) मधील कलम ड अन्वये करण्यात येणार आहे. या नगरसेवकांविरोधात बेकायदा बांधकामप्रकरणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. ग्रामीण भागातील आणखी बारा नगरसेवक अपात्रतेच्या जाळ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. यात बहुतांशी नगरसेवक हे बेकायदा बांधकामांचे भागीदार आहेत, तर काही जणांवर निवडणूक लढवताना खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे.

ग्रामीण भागातील नगरसेवक संकटात

नवी मुंबई पालिकेत एकूण १११ नगरसेवक असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ५२, शिवसेनेचे ३८, काँग्रेसचे १०, भाजपचे ६ नगरसेवक आहेत. पाच नगरसेवक अपक्ष आहेत. काँग्रेस आणि अपक्षांच्या साह्य़ाने राष्ट्रवादीने पालिकेतील सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आहे. यात नागरी वसाहतीतील ५८, केवळ ग्रामीण भागातील २२, झोपडपट्टी क्षेत्र १५ आणि थोडा ग्रामीण व शहरी भाग असलेले १६ नगरसेवक आहेत. त्यातील ग्रामीण व झोपडपट्टी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांवर ही अपात्रतेची शक्यता जास्त आहे.

महापौरांवरही संक्रात?

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आघाडीवर असलेले महापौर सुधाकर सोनावणे आयुक्तांच्या रडारवर असून सोनावणे यांनी आपल्या प्रभागातील रबाळे झोपडपट्टीत विनापरवानगी केलेली काही विकास कामे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहेत. त्यांनी एमआयडीसी व वन विभागाची रीतसर परवानगी न घेता त्यांच्या जमिनीवर पालिकेच्या तिजोरीतून खर्च केला आहे. त्यामुळे या मनमानीप्रकरणी आयुक्त महापौरांवर कारवाई करतील, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

[jwplayer 1yLms27W]

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 nmmc corporators likely to be ineligible in illegal construction case
First published on: 22-11-2016 at 03:16 IST