नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गानजीकच्या सेक्टर २६ नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून २८.५ फूट इतक्या उंचीची भव्यतम फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे. या भव्य स्वरुपात साकारलेल्या शिल्पाकृतीची विशेष नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेस याबाबतचे राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

शहर सुशोभिकरणामध्ये टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर या संकल्पनेचा अत्यंत प्रभावी वापर करण्यात आला असून नवी मुंबई शहरातील अनेक चौकांमध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक शिल्पाकृती साकारण्यात आलेल्या आहेत. बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स संस्थेचे परीक्षक बी. बी. नायक यांनी “टाकाऊ धातूंच्या यंत्रभागांव्दारे बनविलेले देशातील सर्वात उंच शिल्पाकृती” असा मजकूर असलेले राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र व पदक महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे प्रदान केले आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : भिकाऱ्यांना केलेले अन्नदान .. आवडीचे नसेल तर थेट कचऱ्यात..

अनेक समुद्र ओलांडून नवी मुंबईत येणारे रोहीत पक्षी (फ्लेमिंगो) हे नवी मुंबईचे आकर्षण स्थान आहे. नवी मुंबईच्या खाडी किनारी वर्षातील दीर्घकाळ वास्तव्य करणारे फ्लेमिंगो पक्षी बघण्यासाठी पर्यटक, पक्षीप्रेमी व नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून नवी मुंबई शहराची “फ्लेमिंगो सिटी” ही ओळख दृढ करण्यासाठीअंतर्गत शहरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोची आकर्षक भित्तीचित्रे साकारण्यात आली असून अनेक ठिकाणी फ्लेमिंगोच्या शिल्पाकृती बसविण्यात आलेल्या आहेत. या राष्ट्रीय विक्रमामुळे नवी मुंबईची “फ्लेमिंगो सिटी” ही ओळख राष्ट्रीय स्तरावर मुद्रांकित झालेली असून याव्दारे नवी मुंबईच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे असे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा… उरण : राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांच्या वाहनावर अज्ञातांची दगड फेक ; पोलिसात गुन्हा दाखल,तपास सुरू

टाकाऊ यंत्रभागांपासून साकारली धातूची फ्लेमिंगो शिल्पाकृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२६ वेगवेगळ्या यंत्रातील १७९० टाकाऊ यंत्रभागांपासून ही धातूची फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारली आहे. ही शिल्पाकृती २८.५ फूट अर्थात ८.७० मीटर उंचीची असून ३.९ फूट उंचीच्या चौथऱ्यावर बसविण्यात आलेली आहे. १.५ टन वजनाची ही रेखीव फ्लेमिंगो शिल्पाकृती अत्यंत लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे या टाकाऊतून टिकाऊ आकर्षक फ्लेमिंगो शिल्पाकृतीस देशातील सर्वात उंच टाकाऊ धातूंच्या यंत्रभागाव्दारे बनविलेली शिल्पाकृती म्हणून बेस्ट ऑफ इंडिया या नामांकित संस्थेने राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान केले आहे.