पनवेल – पनवेल मतदारसंघात दूबार मतदारांची समस्या पुन्हा एकदा समोर आली असून नव्या मतदार याद्यांमध्ये तब्बल २८०० मतदारांची नावे पुन्हा नोंद झाल्याचा धक्कादायक खुलासा भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केला आहे. या दूबार नावनोंदणीच्या खुलाशानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पनवेल महापालिकेची निवडणूक याच नव्या दूबार यादीनुसार होणार असल्याचे समोर आले आहे.शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतरच पनवेल विधानसभा मतदारसंघात २५,८५५ अधिक दूबार मतदार असल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यानंतरही निवडणूक आयोगाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने निवडणूक आयोगाविषयी साशंकता निर्माण केली जात आहे.

नव्या मतदार नावनोंदणी मोहिमेत पुन्हा २८०० मतदारांची नावे दुबार नोंद झाल्याचे त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला लेखी निवेदनाद्वारे कळविले. आयोगाचे आयुक्त दिनेश वाघामारे यांना हे प्रकरण निदर्शनास आणून देताना, पाटील यांनी मतदार यादीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली.विधानसभा निवडणुकीदरम्यान पनवेल १८८ मतदारसंघात ६ लाख ५२ हजार मतदारांची नोंद होती. नव्या नोंदणी मोहिमेत आणखी २३ हजार मतदारांची वाढ झाली असून, त्यातील २८०० नावे दूबार असल्याचे शेकापच्या तपासात समोर आले आहे.

त्यामुळे एकूण दूबार मतदारांची संख्या २८,६५५ वर पोहोचली आहे.शेकापने दिलेल्या आकडेवारीनुसार, पनवेलच नव्हे तर उरण, एरोली आणि बेलापूर या मतदारसंघांच्या यादीमध्येही पनवेल मतदारसंघातील मतदारांची दूबार नावे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापैकी उरणमध्ये २७,२७५, एरोलीत १६,०९६ आणि बेलापूरमध्ये १५,३९७ मतदारांची नावे दूबार असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच पनवेल विधानसभा मतदारसंघात ५८८ संशयित मतदारांची नोंद, ज्यात कन्नड भाषेतील, पत्ता नसलेले किंवा संशयास्पद पत्त्यांचे मतदार आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.शेकापची मागणीदूबार मतदानावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेकापने आयोगास काही ठोस उपाय सुचविले आहेत.

 मतदार याद्यांवरील दूबार नावांविषयीच्या हरकती सामूहिकरीत्या स्वीकाराव्यात, मतदानाच्या दिवशी मतदाराची पडताळणी करूनच मतदानास परवानगी द्यावी, मतदान केंद्रनिहाय छायांकित यादी उपलब्ध करून द्यावी, आणि बोगस मतदान करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याची आणि फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.पारदर्शकतेवर प्रश्नचिन्हशेकापच्या म्हणण्यानुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान ११,६०० दूबार मतदानांची नोंद केंद्रनिहाय पोलींग एजंटांच्या नोंदींमधून स्पष्ट झाली होती. तरीही निवडणूक आयोगाने अद्याप कारवाई न केल्याने दूबार मतदारांना अभय मिळत आहे.

आता या नव्या याद्यांवरच पनवेल महापालिकेची निवडणूक होणार असल्याने, पावणेसात लाख मतदारांपैकी सूमारे साडेपाच लाख मतदार महापालिकेत मतदान करणार आहे. या सर्व दूबार मतदारांमुळे महाविकास आघाडीतील शेकापसह इतर घटक पक्षांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.निवडणूक आयोगाने यावर वेळोवेळी दिलेल्या स्पष्टीकरणानूसार ‘कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये हे निवडणूक आयोगाचे पहिले उदिष्ट आहे. तसेच दूबार मतदान केले जात असल्यास मतदानानंतर लगेच संबंधित मतदाराच्या बोटाला लावली जात असलेली शाई ही देशात फक्त दोनच ठिकाणी बनवली जाते. ही शाई न पुसली जाणारी असल्याचा दावा आयोगाकडून केला जात आहे. ही शाई बोटावरून पुसून पुन्हा दूबार मतदान केले असल्यास आरोप करणा-या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ही शाई पुसली जाऊ शकते असे प्रात्याक्षिक दिल्यास त्या शाईच्या दर्जेविषयी पुनर्विचार केला जाऊ शकेल.