नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथील शाहबाज गावात पहाटे इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. इंदिरा निवास ही इमारत दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. इमारत एका बाजूला कलल्याचे निदर्शनास आल्यानंतर रहिवाशांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे इमारतीमध्ये वास्तव्य करणारे ४८ रहिवासी बचावले. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे बचाव पथक आणि एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत अचानक कोसळली. यात मोहम्मद मिराज, शफील अन्सारी आणि मिराज अन्सारी यांचा मृत्यू झाला. हेही वाचा >>> नवी मुंबईतील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियक्ती ही अनधिकृत इमारत रात्री अचानक कलली. हा प्रकार याच भागात राहणारा रिक्षाचालक आणि केशकर्तनालय चालवणाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी रहिवाशांना बाहेर काढले. या इमारतीमध्ये एकूण ३ दुकाने व १७ सदनिका होत्या. शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ही चार मजली इमारत अनधिकृत होती. पालिकेने नोटीसही बजावली होती. या इमारतीचा विकासक तसेच मूळ मालक यांच्यावर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पालिकेने दिली. दोषींवर कठोर कारवाई फडणवीस अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक लगेच घटनास्थळी पाचारण करण्यात आले. नवी मुंबई महापालिका आयुक्तही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीतून बाहेर काढलेल्या नागरिकांची महापालिकेच्या निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. इंदिरा निवास इमारत कशी पडली, नेमक्या कोणत्या उणिवा होत्या याची चौकशी करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व रहिवाशांची महापालिकेच्या माध्यमातून निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. -डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका