scorecardresearch

नवी मुंबई : कोकण विभाग मतदार संघाच्या नवीन मतदार यादीत ३७ हजार ७१९ मतदार

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी ३० डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली.

नवी मुंबई : कोकण विभाग मतदार संघाच्या नवीन मतदार यादीत ३७ हजार ७१९ मतदार
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी विशेष नियोजन : कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली असून, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये एकूण ३७ हजार ७१९ मतदार आहेत.  तसेच या  निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, याचा भंग होणार नाही याबाबत विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती  कोकण विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

मंगळवारी कोकण भवनातील समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

भारत निवडणूक आयोगाकडून १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत कोकण शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.  या घोषित कार्यक्रमानुसार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी  २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या यादीनुसार कोकण विभागात एकूण ३० हजार १६२ मतदार असून त्यापैकी १६ हजार ८२ स्त्री मतदार असून १४हजार ८० पुरुष मतदार होते.  

या मतदार याद्यांवर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्राप्त झालेले दावे व हरकती निर्णीत करुन कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी ३० डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली. या अंतिम यादीनूसार कोकण विभागात एकूण ३७ हजार ७१९ मतदार असून त्यापैकी १८ हजार ९७ स्त्री मतदार आहेत तर १९ हजार ६२२ पुरुष मतदार आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर कोकण  विभागीय आयुक्त पदी रुजू

अंतिम यादी जाहीर झाल्या नंतर भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२२ च्या परिपत्रकान्वये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यमक्रमानूसार  ५ जानेवारी २०२३रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल आणि १२ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक असेल.  १३ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. तर १६ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. ३०जानेवारी रोजी मतदान होईल. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी असेल. २ फेब्रूवारी रोजी मतमोजणी केली जाईल आणि ४ फेब्रूवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.

आचारसहिंतेबाबत माहिती देताना आयुक्त डॉ. कल्याणकर म्हणाले की, कोकण विभागात जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली असून,  या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर  तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती  व भरारी पथक स्थापन करण्यात येत आहेत. 

तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात येत असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष,लोक प्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येईल. विभागीयस्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे असल्याची नवनियुक्त आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या पत्रकार परिषदेत केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 23:44 IST

संबंधित बातम्या