सर्वसाधारपणे जानेवारीच्या मध्यापासून सुरू झालेल्या हापूस आंब्याची आवक जवळजवळ संपली असून या पाच महिन्यांत कोकणातून वाशी येथील घाऊक बाजारपेठेत हापूस आंब्याच्या ५२ लाख पेटय़ा आल्याची नोंद आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक आवक आहे. यंदा दक्षिण भारतातील हापूस आंब्याचीही मोठी आवक झाली. त्यामुळे वाशी बाजारात हापूस ६० ते ७० रुपये प्रति डझन दराने घाऊक बाजारात मिळत आहे.

बाजारात डिसेंबर ते सप्टेंबर या दहा महिन्यांत आंब्याचे विविध प्रकार पाहण्यास मिळतात मात्र डिसेंबरच्या अखेर देवगडमधील हापूस आंब्याची एखादी पेटी बाजारात येऊन हापूस आंब्याची वर्दी दिली जाते. त्यानंतर जानेवारीच्या मध्यापासून तुरळक प्रमाणात हापूस आंबा बाजारात डेरेदाखल होतो. गतवर्षी पडलेला चांगला पाऊस, त्यानंतरची थंडी, आणि कडाक्याचा ऊन यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीनही जिल्ह्य़ांत हापूस आंब्याचे चांगले पीक आले.

देवगडहून येणाऱ्या हापूसची आवक थांबली आहे. रत्नागिरीहून हापूस आंब्याची काही प्रमाणात आवक सुरू आहे. ती येत्या चार ते पाच दिवसांत संपुष्टात येईल, अशी माहिती माहिती वाशी बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

हापूस आंब्याचा व्यापार अनेक फळ व्यापाऱ्यांना उभारी देणार असल्याने या काळात सुमारे सहाशे ते सातशे कोटीपर्यंत आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा हापूस आंब्याला कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या दाक्षिण भारतातील राज्यातून मोठय़ा प्रमाणात हापूस आंबा वाशी, पुणे येथील घाऊक बाजारपेठेत आल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे कोकणातूनच हापूस आंब्यांची रोपे घेऊन जाऊन ही लागवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे देवगडच्या कातळावरी हापूस आंबा वगळता कोकणातील इतर भागातील हापूस आंब्यासारखाच हा हापूस आंबा असल्याचे आढळून आले आहे. या हंगामात दक्षिणेतील २५ ते ३० लाख पेटय़ा घाऊक बाजारात विकल्या गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही हापूस आंब्यांच्या मिळून ७५ ते ८० लाख पेटय़ा घाऊक बाजारात यंदा आल्या.

गुजरात व नंतर जुन्नर येथील हापूस आंब्याची आवक सुरू होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधून येणारा लंगडा, चौसा, दशेहरा हा आंबा प्रकार पावसाळ्यात देखील सुरू राहणार असून नीलम व तोतापुरी हा दक्षिणेतील आंबाही येत आहे.

७०० कोटींची उलाढाल

हापूस आंब्याचा व्यापार अनेक फळ व्यापाऱ्यांना उभारी देणार असल्याने या काळात सुमारे सहाशे ते सातशे कोटीपर्यंत आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा कोकणच्या हापूसला अन्य प्रांतांतील हापूसचे आव्हान असूनही त्याची विक्री मोठय़ा प्रमाणात झाली आहे.

कोकणातील हापूस आंब्याचा मोसम आता संपला असून गुजरातमधील हापूस आंबा येऊ लागला आहे. यंदा मागील चार वर्षांतील सर्वाधिक हापूस आंबा बाजारात आलेला आहे. दक्षिणेतील हापूस आणि कोकणातील हापूस आंब्याच्या स्पर्धेमुळे यंदा हापूस आंब्याचे भाव कमी झाले होते मात्र त्या तुलनेने किरकोळ बाजारात हापूस आंबा कमी विकला गेला.

– संजय पानसरे, माजी संचालक, फळ बाजार, एपीएमसी