नवी मुंबई : नवी मुंबई शहरात शनिवारी २४ जूनपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र या तुरळक पावसाच्या सरीने शहरातील झाडांची पडझड वाढली आहे. दररोज १० झाडे उन्मळून पडत आहेत. आतापर्यंत ५ दिवसांत ५३ झाडे पडली आहेत. मात्र पडलेल्या झाडांमध्ये ठिसूळ असलेली गुलमोहरची झाडे अधिक आहेत अशी माहिती उद्यान अधिकारी यांनी दिली आहे.
काही वर्षांपूर्वी नवी मुंबई शहरात निसर्ग वादळात मोठया प्रमाणावर वृक्षांची पडझड झाली होती. सुसाट्याच्या वाऱ्याने शहरातील बऱ्याच विभागात, पाम बीच मार्गवार नेरुळ आणि वाशी मध्ये मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली होती. मात्र सध्या शहरात तुरळक पाऊस सुरु असून त्या मध्ये ही मोठया संख्येने वृक्ष कोसळून पडत आहेत. २४ जून पासून ते २८ जूनपर्यंत ५३ झाडे पडली आहेत. ही झाडे वाहनांवर पडल्याने वाहनांचे देखील नुकसान होत आहेत. नुकतेच मोसमी पावसाने सुरुवात केली असून पडणाऱ्या झाडांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हलक्या पावसाच्या सरीने देखील झाडे पडण्याच्या घटना का घडत आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
हेही वाचा >>>टोमॅटो नंतर आता मिरच्याही महागल्या, घाऊकमध्ये प्रति किलो ६०-८० रुपये तर किरकोळ बाजारात…
नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसांत पावसाने झाडे पडण्याची घटना घडत आहेत. मात्र याठिकाणी धोकादायक वृक्ष कमी असून ठिसूळ असेलली गुलमोहरची झाडे सर्वाधिक आहेत. ही झाडे हलक्या वाऱ्याने देखील तग धरणारी नसल्याने उन्मळून पडत आहेत. -दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग, नवी मुंबई महापालिका