शनिवार व रविवारी दोन दिवसात वंडर्स पार्कला भेट देण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे वंडर्स पार्क परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शनिवारी ८८६४ नागरिकांनी तर आज रविवारी ९८३९ नागरिकांनी वंडर्स पार्कला भेट दिली. वंडर्स पार्क प्रवेशाची वेळ संपल्यानंतरही तिकिटाच्या मागणीवरून बाचाबाचीचा प्रसंग ही घडला. शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दोन दिवसात १८७०३ दिली भेट त्यामुळे वाहतूक नियंत्रण व तिकीट वाटप करताना काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.
नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्कच्या नूतनीकरणानंतर १ जून पासून वंडर्स पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. सध्या शालेय सुट्टीचे दिवस असल्यामुळे नागरिकांची आपल्या मुलांसह उत्साही गर्दी वंडर्स पार्कमध्ये बघायला मिळाली. पार्कमध्ये नव्याने बसविण्यात आलेल्या ७ राईड्स बसवण्यात आले असून मागील आठवड्यात ३ जूनला स्काय स्विंगर या पाळणा स्वरूपातील राईडवर अपघात घडला होता व काही व्यक्तींना दुखापत झाली होती. परंतु वंडर्स पार्कचे आकर्षण असल्याने मोठ्या संख्येने नागरिक पार्कला भेट देत असल्याचे चित्र आहे. वंडर्स पार्कला मिळत असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्रतिसादामुळे या पार्कच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचीही गर्दी वाढत आहे.