नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कलंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार करण्यास आलेल्या व्यक्तीला मारहाण करणे अपमानास्पद वागणूक देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अद्याप अटक झाली नसून तपास सुरू आहे.
यातील फिर्यादी विकास उजगरे हे एका रुग्णालयात काम करीत असून ६ जानेवारीला आपले काम आटोपून काही मित्रांच्या समवेत त्यांनी पार्टी केली. नंतर येथुल सुधागड महाविद्यालय नजीक दत्ताकृपा चायनीज हॉटेल वर जेवण करीत असताना त्यांचा मित्र तुषार यादव आणि वेटर मध्ये ऑर्डर वरून शाब्दिक बाचाबाची झाली. यात विकास यांनी मध्यस्थी करून वाद वाढू दिले नाहीत. काही वेळाने सर्व निघून गेले मात्र यादव यांनी पिशवी हॉटेल वरच विसारल्याचे लक्षात आल्यावर विकास हे आणावयास गेले. ते हॉटेलवर जाताच त्यांना हॉटेल कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्यांनी स्वतःची सुटका करून घेत कंट्रोलला फोन करून मदत मागितली. त्यावेळी पोलीस पथक आले. त्यांनी कलंबोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्यामुळे विकास हे पायीच कलंबोली पोलीस ठाण्यात गेले. मात्र त्यापूर्वीच हॉटेल मालक निलेश भगत व एक कामगार त्या ठिकाणी पोहचले होते.
हेही वाचा- नवी मुंबई : उरणमधील कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमधील दगड झाले बोलके
हॉटेल वर मारहाण झाल्याने विकास यांच्या पोटात दुखत होते. त्यामुळे रुग्णालयात जाण्याची विनंती त्यांनी उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना केली मात्र त्यांनी विकास यांची ना तक्रार लिहून घेतली ना त्यांना रुग्णालयात पोहचवले. उलट विकास यांनाच कमरपट्टा वापरून मारहाण केली आणि जातीवाचक उल्लेख करीत अंगावर थुंकले व शिवीगाळ केली तसेच बूट चालण्यास भाग पाडले. मात्र काही वेळाने विकास यांच्या परिचित तेथील एका पोलीस कर्मचाऱ्याने विकास हा पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांचा पाहुणा असल्याची माहिती देताच दिनेश पाटील यांची वागणूक एकदम बदलून गेली. त्यांनी विकास याला जवळ घेत गोड बोलणे सुरू केले व रुग्णालयात दाखल केले. तेथे दुसऱ्या दिवशी पाहण्यास ही आले. त्यावेळी विकास यांच्याच विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
हेही वाचा- नवी मुंबई : द्राक्ष हंगाम सुरू होण्याला महिना लागणार; घाऊक बाजारात द्राक्ष प्रतिकिलो ६०-१००रुपयांवर
विकास हे तीन दिवसांनी उपचार घेऊन रुग्णालयातून बाहेर पडल्यावर दिनेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पाटील यांची चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल. अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.