नवी मुंबई : इंग्रजी शाळेत ‘काव्यरंग’ च्या मंचावरून ज्येष्ठ कवि ना.धों. महानोर यांच्या कवितांचा बहर सजला होता. निमित्त होते महानोर यांच्या स्मृती दिनाचे. या काव्य स्पर्धेत तब्बल ७५ विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरण केले. कोपरखैरणेतील नॉर्थ पॉईंट शाळेत मराठी कवितांची ही स्पर्धा पार पडली. 

‘मीच माझा एककल्ली एकटाच चालीत गेलो’ आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश  झालो.. या ना.धों. महानोर यांच्या कवितेनेच काव्य स्मृतींना उजाळा देत काव्यवाचन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. नुकतीच या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मोठ्या शहरात इंग्रजी शाळेत मराठीला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचा आरोप नेहमी होतो. मात्र अशाही काही इंग्रजी शाळा आहेत ज्या ठिकाणी मराठीपणा जपण्याचे प्रयत्न केले जातात.

हेही वाचा – खेलो इंडिया वुमन्स लिग पिंच्याक सिलॅट स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंचे वर्चस्‍व

कोपरखैरणेत आयसीएससीईच्या नॉर्थ पॉईंट शाळेत निसर्गकवि म्हणून ओळखले जाणारे कवि ना.धों. अर्थात नामदेव धोंडो महानोर यांचे स्मृती प्रित्यर्थ मराठी काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. ३ ऑगस्टला ना.धों. महानोर यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा तसेच काव्य विषयात आजच्या पिढीची रुची वाढावी या हेतूने सदर स्पर्धेचे दोन गटांत आयोजन केले होते. या स्पर्धेत ७५ विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. शमिका वाघमले, सौरिष घाग, आर्या गुरव, चिराग भदाणे आणि आर्यन बंसू या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले. 

पारितोषिक वितरण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सुधा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कवयित्री, प्राध्यापिका वृंदा संतोष कवठेकर, लेखिका, कवयित्री ऋता मनोज भामरे यांनी परीक्षकांची भूमिका बजावली. दोन्ही परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे वाचन, कवितेची केलेली निवड, लय, उच्चार आणि मुख्यतः सादरीकरण याचे मनसोक्त कौतुक केले.

हेही वाचा – अत्याधुनिक स्वयंचलित कुलुपावर विश्वास ठेवणे पडले महागात, चोरांनी चौकट उचकटून केली घरफोडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठीकडे काही प्रमाणात पाठ फिरवलेली चित्रे आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत असतानाच आय.सी.एस.ई. बोर्डमधून शालेय पातळीवर भरवण्यात आलेली ही स्पर्धा एक ठोस भूमिका घेणारे पाऊल आहे. मराठी विषयाची विद्यार्थ्यांच्या मनातील रुची वाढविण्यासाठी शिक्षकांइतकाच पालकांचा मिळालेला पाठिंबा हा खूप चांगला होता, अशी प्रतिक्रिया परीक्षकांनी दिली.