पनवेल : तळोजा परिसराताल पेठाली गावात २४ एप्रिलला ३० वर्षीय महिलेने पोटच्या मुलीची हत्या करुन घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तळोजा पोलीसांनी सुरूवातीला बालिकेची हत्या करुन नैराश्यामुळे महिलेने आत्महत्या केल्याचा गुन्हा नोंदवला होता.
सुरूवातीला आकस्मित मृत्यूची नोंद करणा-या या प्रकरणात आत्महत्या करणा-या मुलीच्या वडिलांनी १ मे रोजी पोलिसांत सासरकरांनी वंशांचा दिवा देऊ न शकल्याने वेळोवेळी छळ केल्याने हे पाऊल उचलल्याची तक्रार केली. दुहेरी मृत्यूनंतर आठवडाभराने याबाबत गुन्हा नोंदवल्यानंतरही नवी मुंबईचे पोलीस सासरकरांना अटक न करु शकल्याने मुलीच्या वडिलांनी व नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांशी संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
पेठाली गावात २४ एप्रिलला क्वारी मालक अभिषेक बाळाराम केणी याची पत्नी सोनम हीने सायंकाळपासून तीच्या खोलीत स्वताला कोंडून घेतल्याचे दाखविण्यात आले. सायंकाळ नंतर घराचा दरवाजा तोडल्यानंतर तीने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तीच्या पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीत पुढे आले आहे. मात्र तीने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर तीच्या आईवडील किंवा पोलिसांना सांगीतले नाही असा आरोप सोनम हीचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी केला आहे. सोनम हीचे शिक्षण कला शाखेच्या दूस-या वर्षापर्यंत झाले आहे.
अभिषेक याचा क्रशर खाणीचा व्यवसाय असल्याने सोनम हीचा संसार चांगल्या घरात होईल या अपेक्षेने हे लग्न तीच्या नातेवाईकांनी करुन दिले होते. या लग्नात सोन्याचे दागीने आणि महागड्या भेटवस्तू माहेराकडून दिल्याची माहिती सोनमचे काका अशोक पाटील यांनी दिली. सोनम आणि अभिषेक यांचा विवाह मार्च २०१८ मध्ये झाला. सोनमला पावणेपाच वर्षांची देवांशी नावाची मुलगी होती. सोनम हीचे वडिल ज्ञानेश्वर यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार सोनम हीची सासू आणि नणंदांकडून मुलगा होत नाही, माहेराहून काय आणले असे टोमणे सतत मारत असल्याने तीला नैराश्य आल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी पती अभिषेकसह सासू प्रभावती आणि सोनमच्या चार नणंदांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सोनम या सुशिक्षित होत्या. त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोटच्या मुलीला सोनम यांनी उशीने गुदमरुन मारल्याचे तपासात समोर आल्याचे सुरूवातीला पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मात्र सध्या तळोजा पोलीसांशी संपर्क होऊ शकला नाही. मागील वर्षी सोनमच्या एका वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्यापासून ती तणावात असल्याचे सासरकरांकडून सांगीतले जात होते.