scorecardresearch

नवी मुंबईत १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर उद्यानात बलात्कार

दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस तत्पर असल्याची घोषणा केली आहे.

नवी मुंबईत १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर उद्यानात बलात्कार
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

नवी मुंबईतील नेरुळमधील एका उद्यानात दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे घाबरलेली पिडीता घरी गेल्यावर तिच्या पालकांनी तिला जखमी अवस्थेत पाहिल्यावर सर्वात प्रथम तिला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संबंधित घटनेबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात बुधवारी पहाटे या घटनेची नोंद करण्यात आली.नेरुळ येथील सेक्टर २२ मधील बालाजी मंदिरासमोरील उद्यानात रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. संबंधित पिडीत महाविद्यालयीन विद्यार्थिनी नवीन पनवेल वसाहतीमध्ये राहणारी आहे. पिडीता शिकवणी वर्गासाठी गेली होती.

त्यानंतर पिडीता तिच्या मित्रासोबत उद्यानात बसली होती. संबंधित आरोपीने या विद्यार्थ्यांना प्रेमी युगुल असल्याचे पाहून धमकावले. त्यानंतर त्या पिडीतेच्या मित्राला उद्यानातून पळण्यास भाग पाडले. त्यानंतर पिडीतेच्या असह्यतेचा फायदा उचलत तिच्यावर बलात्कार केला. पिडीतेने या घटनेनंतर कसेबसे घर गाठले. पालकांनी या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस ठाणे गाठले. नवी मुंबईत रस्त्याने पायी जाणा-यांना पोलीस असल्याचा बनाव करुन लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. असाच काहीचा प्रकार या पिडीतेसोबत घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : हिरव्या वाटाण्याचा स्वस्ताईचा हंगाम सुरू; घाऊक बाजारात प्रतिकिलो १६ ते २० रुपयांवर

मंगळवारी रात्री ही घटना घडली. त्याच दिवशी नेमकी राज्यातील विविध पोलीस आयुक्तांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यामुळे या घटनेकडे हव्या तेवढ्या गांर्भीयाने पोलीस तपास सुरु नसल्याची चर्चा आहे. चार दिवस उलटले तरी पोलिसांनी या प्रकरणातील बलात्का-याला अटक केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस तत्पर असल्याची घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 09:50 IST

संबंधित बातम्या