बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या टोळीचा सूत्रधार १८ दिवसांनंतरही कामोठे पोलिसांना सापडलेला नाही. जुई कामोठे येथील धाड सत्रामध्ये अटक झालेल्या संशयित आरोपींनी ही वाळू गणेश वर्मा व त्याचे सहकारी खाडीतून आणून देत असल्याचा जबाब दिल्याने या उपशाचा मुख्य सूत्रधार गणेश वर्मा व त्याची टोळी असल्याचे बोलले जात आहे. पोलीस सध्या या वर्माच्या मागावर आहेत मात्र तो अद्याप हाती लागलेला नाही.जुई कामोठे गावामध्ये १५ ऑक्टोबरला वाळू उपसा सुरू असताना साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्यानंतर वाळूचा हा काळाबाजार उघडकीस आला. याप्रकरणी अटक झालेल्यांनी पोलीस जबाबात ही वाळू गणेश वर्मा आणि त्याचे सहकारी खाडीतून काढून देत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी वर्मा याच्या घरी छापा टाकला, मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. वर्मा याच्यावर खारघर व इतर पोलीस ठाण्यांत तीनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. जुई कामोठे येथील पोलिसांनी जप्त केलेल्या २१० ब्रास वाळूचा महसूल विभागाने लिलाव केला. या लिलावामधील वाळू दिलेल्या मुदतीमध्ये तेथून न उचलल्यास या ठिकाणचा उपयोग पुन्हा बेकायदा वाळू उपसा करण्यासाठी होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पोलीस आणि महसूल विभागाने ज्या ठिकाणी लाखो रुपये किमतीची वाळू व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहेत तेथे पुन्हा हे प्रकार न घडण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2015 रोजी प्रकाशित
वाळू माफिया अद्याप फरार
बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या टोळीचा सूत्रधार १८ दिवसांनंतरही कामोठे पोलिसांना सापडलेला नाही.
Written by मंदार गुरव

First published on: 04-11-2015 at 04:58 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Absconding sand mafia