दुसऱ्या दिवशी यादवनगरमधील ३०० बेकायदा झोपडय़ा जमीनदोस्त

यादवनगर येथील एमआयडीसीच्या जागेवर बांधण्यात आलेल्या बेकायदा झोपडय़ांवरील कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. ३०० झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे बेकायदा बांधकामांत राहणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

गेल्या शनिवारी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यादवनगर परिसरात ‘वॉक विथ कमिशनर’ अंतर्गत दौरा केला. झोपडपट्टीमधील रहिवाशांनी पाणी, पार्किंग, वीज, शौचालये या समस्या मांडल्या. एमआयडीसीच्या जागेवर २००० नंतर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचे आयुक्तांच्या निर्दशनास आले. या झोपडपट्टीधारकांमुळे पालिकेला सोयी सुविधा पुरवण्यात अपयश येत असल्याने या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यादवनगरमधील अनधिकृत तबेल्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने तबेल्यावर देखील कारवाईचे आदेश देण्यात आले होते. गुरुवारी चार अनधिकृत तबेले जमीनदोस्त करण्यात आले. ७० म्हशी जप्त करण्यात आल्या. बुधवारी केलेल्या कारवाईत ५०० अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईमुळे झोपडपट्टीवासीयांचे धाबे दणाणले आहेत. पालिका आयुक्त मुंढे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आले आणि रहिवाशांना रस्त्यावर आणले, अशा प्रतिक्रिया कारवाईनंतर उमटल्या. कारवाईसाठी नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ-२ चे उपआयुक्त अमरीश पटनिगिरी, कार्यालयीन अधीक्षक गणेश आघाव, ऐरोली, दिघा, घणसोली विभाग अधिकारी आदी पालिकेचा फौजफाटा तैनात होता. या कारवाईसाठी ४ जेसीबी, ५० कामगार व मोठय़ा प्रमाणात पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

वॉक विथ कमिशनरची तुभ्रेवासीयांना धास्ती 

आयुक्तांनी ‘वॉक विथ कमिशनर’अंतर्गत शनिवारी दिघा येथील यादवनगर परिसराला भेट दिल्यानंतर येत्या शनिवारी ते तुर्भे भागाला भेट देणार आहेत. आयुक्तांनी यादवनगरला भेट दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांत तेथील ८०० पेक्षा अधिक झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे येत्या शनिवारी तुभ्रे येथे होणाऱ्या वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाचे काय परिणाम होतील, याविषयी तुर्भेवासीय संभ्रमात आहेत.

[jwplayer Aq5rYvTT]

तुर्भे, कोपरखैरणेत इमारतींवर कारवाई

नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेता तुर्भे सेक्टर-२१ मध्ये उभारण्यात आलेली, एक बेकायदा इमारत पालिकेने गुरुवारी जमीनदोस्त केली. या वेळी प्रकल्पग्रस्तांनी कारवाईला विरोध करीत विभाग कार्यालयाला घेराव घातला, मात्र पोलिसांनी अटकाव केल्यामुळे पालिकेने पुढील कारवाई करण्यास पुन्हा सुरुवात केली.

पालिकेने बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली असून प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या घरांवरही बुलडोझर फिरवला जात आहे. कोपरखैरणे येथील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरदेखील कारवाई करण्यात आली. तुर्भे गावचा सिटी सव्‍‌र्हे झाला आहे. काही प्रकल्पग्रस्तांनी घरांचा विस्तार हाती घेतला आहे, त्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक आले असता ग्रामस्थांनी त्याला कडाडून विरोध केला. विभाग अधिकाऱ्यांना भेटून ही कारवाई त्वरित थांबवण्याची विनंती केली, मात्र गावांमध्ये पालिकेची परवानगी न घेता सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरूच राहील, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी विभाग कार्यालयाला घेराव घातला. प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरच कारवाई का केली जाते, शासनाच्या जमिनींवर मोठय़ा प्रमाणात उभ्या असलेल्या बेकायदा झोपडय़ांना अभय का दिले जाते, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. चोख पोलीस बंदोबस्तामुळे तुर्भे गावाला छावणीचे रूप आले होते. या वेळी स्थानिक नेतेदेखील कारवाई थांबवण्याची मागणी करीत होते. या संदर्भात पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी कैलास गायकवाड म्हणाले, पालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे पालिकेने कारवाई केली आहे असे स्पष्ट केले.

एमआयडीसीच्या भूखंडावरील २००० नंतरची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी एमआयडीसीने भूखंड सील करावेत किंवा तिथे कुंपण घालावे, असे पत्र पालिकेच्या वतीने एमआयडीसीला देण्यात आले आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

[jwplayer alt3yzu5]