या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खारघरमधील २ दिवसांतील कारवाई; हॉटेलांनी बळकावलेली जागा मोकळी

पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी खारघर वसाहतीमधील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली, त्यातून दोन दिवाांत चार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुकानांच्या समोरील सामायिक वापराच्या जागेचा (मार्जिनल स्पेस) ताबा स्वतकडे ठेवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत. वसाहतीमधील ‘थ्री स्टार’ व ‘तवा’ या प्रसिद्ध हॉटेलांच्या मालकांनी आयुक्तांच्या कारवाईनंतर मार्जिनल स्पेसवरील छत काढून घेतले आहे. या हॉटेलचालकांनी सामायिक वापराच्या जागेत टेबल-खुच्र्या मांडून व्यवसाय थाटला होता.

आयुक्त सुधाकर शिंदे यांनी अतिक्रमणांवरील कारवाई रात्रभर सुरू ठेवली. त्यामुळे खारघरमध्ये सामान्य रहिवाशांचे आणि पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले. पहिल्या दिवशी दीड लाख व त्यानंतरच्या दिवसांमध्ये अडीच लाखांच्यावर दंडात्मक महसूल दुकानदारांकडून वसूल करण्यात आला. काही व्यापाऱ्यांनी ही रक्कम धनादेशाच्या स्वरूपात स्वीकारण्याची मागणी केली तर काहींनी डेबिट कार्डने पैसे देण्याचा मार्ग सुचवला, मात्र पनवेल पालिकेकडे अद्याप अशी तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. आयुक्त तडकाफडकी कारवाई करतात आणि दंडाची रक्कमही संबंधित व्यापाऱ्यांना तत्काळ भरावी लागते. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे खारघरमधील दुकानदारांवर वचक बसला आहे. अनेक दुकानदारांनी आयुक्तांची कारवाई होण्याआधीच स्वत:च्या दुकानासमोरचे वाढविलेले छत स्वखर्चाने काढून टाकले आहे.

कारवाई होणार नसल्याचा भ्रम दूर

खारघर वसाहतीच्या परिसरात स्वतंत्र पालिका स्थापन करा अन्यथा नवी मुंबई पालिकेमध्ये हा भाग समाविष्ट करा, अशी मागणी येथील काही रहिवाशांनी केली होती. त्यानंतरही सरकारने खारघरसह पनवेलमध्ये महापालिका स्थापन केली. त्यानंतर सिडको प्रशासनाकडेच खारघर राहणार, अशी बातमी पसरली होती. परंतु सिडको प्रशासनाकडे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार असल्यामुळे या परिसरात महापालिका प्रशासन काम करणार नाही, असा समज येथील बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये पसरला होता. तो आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दूर केला.

व्यापाऱ्याने आयुक्तांकडे ओळखपत्र मागितले

खारघर येथील व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे हटवण्याचा सपाटा आयुक्त सुधाकर शिंदे यांनी लावला असताना आणि आयुक्त स्वत सातत्याने कारवाईसाठी उपस्थित असताना खारघरमध्ये कारवाईदरम्यान एका व्यापाऱ्याने आयुक्तांकडे ओळखपत्र मागितले. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. खारघर येथील सेक्टर १५ मधील डीमार्ट मॉलशेजारी असलेल्या एका दुकानाच्या चालकाने तुम्हीच आयुक्त कशावरून, असा प्रश्न विचारला आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. नोटिसा न देता केलेल्या या कारवाईमुळे खारघरचे दुकानदार त्रस्त झाले असले, तरी सामान्य नागरिक समाधानी आहेत. आयुक्तांना ओळखपत्र विचारल्यावर त्यांनी स्वतच्या लाल दिव्याच्या गाडीकडे बोट दाखवले. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पाठवले. यादरम्यान संबंधित दूकानदाराने एका बडय़ा पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधून ओळखपत्र विचारणे हा गुन्हा आहे का, अशी आपली बाजू मांडली. हे प्रकरण खारघर पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी या घटनेची नोंद केली. परंतु कारवाई केली नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on illegal encroachment in vashi
First published on: 19-01-2017 at 00:46 IST