नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, वाशी क्षेत्रात सुमारे ४३५ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून त्यापैकी १७० मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. रविवारी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. या २६५ सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे २२ तलावांत विसर्जन होईल. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने तलावांवर व विसर्जन मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता २ सहा. पोलीस आयुक्त, २२ पोलीस निरीक्षक, १०० सहाय्यक व  उपपोलीस निरीक्षक, ८०० पोलीस कर्मचारी, दीडशे महाविद्यालयीन विद्यार्थी व इतर स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक हजर राहणार आहेत. तसेच विसर्जन मार्गावरील मुख्य रस्ता बंद करण्यात येणार असून ठिकठिकाणी बॅरिकेड्सचा वापर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या व शिस्तप्रिय गणेश मंडळांना उत्कृष्ट गणेशमूर्ती, उत्कृष्ठ देखावा, राबविलेले समाजोपयोगी कार्यक्रम, पोलीस निर्देशांचे केलेले पालन, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक या गटांत प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देणार आहे. प्रत्येक बक्षीस पोलीस ठाण्याच्या पातळीवर दिले जाणार आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्राला लाभलेला २२ किमी अंतराचा खाडीकिनारा पाहता अनेक भाविक गणरायाला या खाडीच्या पाण्यात निरोप देत असल्याचे पाहून पालिकेने तराफा आणि मोठय़ा मूर्तीसाठी फोर्कलिफ्टची व्यवस्था केली आहे. नवी मुंबईत २३ विसर्जनस्थळे आहेत तर पनवेल-उरणमध्ये ३० ठिकाणी गणपतीबाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई पालिकेने केलेल्या विशेष उपाययोजना
* तलाव, खाडीतील विसर्जनस्थळापूर्वी बांबूंचे कुंपण
* स्वयंसेवक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात
* आरती व मूर्ती ठेवण्यासाठी विसर्जनस्थळाजवळ टेबलाची सोय
* तलावांच्या एका कोपऱ्यात गॅबियन वॉलची बांधणी, त्याच ठिकाणी विसर्जनाची सक्ती
* मोठय़ा मूर्तीसाठी तराफे आणि फोर्कलिफ्टची सोय
* विद्युत व्यवस्थेसह जनरेटर
* पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय व्यवस्था
* भाविकांच्या स्वागतासाठी मंच, सूत्रसंचालक, आणि सूचना
* शहरातील साथीच्या आजारांना रोखण्यासाठी फलकाद्वारे प्रबोधन
* निर्माल्य वाहून नेण्याची स्वतंत्र व्यवस्था
* दोन हजार पोलीस तैनात

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration is ready for ganesh visarjan
First published on: 26-09-2015 at 08:39 IST