नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुकामेव्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असताना, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) मसाला बाजारात सुकामेव्यात भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने तत्काळ कारवाई करत संबंधित व्यापाऱ्याचा गाळा बंद करण्याची कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मसाला बाजारातील अंबिका ड्रायफ्रूट एलएलपी, गाळा क्रमांक जी-७ मध्ये बदाम, काजू आणि मनुका यांसारख्या सुकामेव्यावर रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून भेसळ केली जात असल्याचे व्हिडिओत दिसून आले होते. या व्हिडिओची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मसाला बाजाराच्या आवारात शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) पाहणी केली. अधिकारी रश्मी वंजारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असून, पाहणीनंतर संबंधित गाळा बंद करून सिल करण्यात आला आहे. तसेच संबंधित व्यावसायिकाला तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हिडिओत दिसणाऱ्या दृश्यांनुसार, मनुका रासायनिक द्रावणात धुतल्या जात असून, त्यावर रंग आणि पूड टाकून ‘चमकदार’ बनविण्याची प्रक्रिया चालू होती. त्याचप्रमाणे, काजू आणि बदाम उघड्यावर साठवून स्वाद वाढविण्यासाठी भट्टीत ठेवले जात असल्याचेही आढळले. या प्रक्रियेत स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा तसूभरही विचार न झाल्याचे दिसून आले.

दिवाळीच्या काळात सुकामेव्याची खरेदी वाढत असताना हा प्रकार उघड झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने याबाबत, “अन्नसुरक्षेच्या प्रकरणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

सध्या बाजारात सुकामेव्याचे दर ५०० ते २२०० रुपये किलोपर्यंत आहेत. आकर्षक पॅकिंग आणि स्वाद वाढविण्यासाठी प्रक्रिया केलेला सुकामेवा त्याहून महाग विकला जात आहे. मात्र, या चमकदार पॅकिंगच्या आड नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ उघड झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

“दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षेबाबत प्रशासन कोणतीही तडजोड करणार नाही हा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.”- योगेश ढाणे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन