पनवेल: मुंब्रा पनवेल महामार्गावरील तळोजा (आर.ए.एफ कॅम्प) आणि रोडपाली जंक्शन येथे दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीसाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तातडीने उपाययोजना करावी अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा भिमशक्ती संघटनेने दिल्यानंतर कळंबोली पोलिसांनी मध्यस्थीसाठी बैठक लावल्यानंतर एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र आंदोलकांना दिल्यानंतर काही काळासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
मुंब्रा पनवेल महामार्गावर तळोजा वसाहतीचे प्रवेशव्दार आणि रोडपाली जंक्शन येथे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीत हा महामार्ग येत असल्याने या विभागाचे अधिकारी या वाहतूक कोंडीसाठी ठोस उपाययोजना करु शकले नाहीत. भिमशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रोजच्या कोंडीला वैतागून २१ नोव्हेंबरला रास्तारोको करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा इशारा दिला होता. मात्र यावर कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप गुजर यांनी आंदोलक गायकवाड आणि एमएसआरडीसी संदीप यादव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) पदाधिकारी सतीश पाटील यांच्यासोबत चर्चा केली.
हेही वाचा… नवी मुंबई: शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक
पोलीस ठाण्यात झालेल्या या बैठकीमध्ये एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी रोडपाली जंक्शन येथील कोंडी सोडविण्यासाठी नावडे गावाचा सद्यस्थितीतील उड्डाणपुल ते खिडुकपाडा गावापर्यंत असा नवा उड्डाणपुल बांधण्यासाठी विस्तृत विकास आराखड्याचा अहवाल तयार करुन तो केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयातील मुख्य अभियंत्याकडे मंजूरीसाठी १ नोव्हेंबरला पाठविल्याची माहिती दिली. या अहवालामध्ये रोडपाली उड्डाणपुलासाठी ४४ कोटी २६ लाख रुपये खर्च होण्याची शक्यता असल्याची म्हटले आहे. तसेच तळोजा जंक्शन (आर. ए.एफ. कॅम्प) येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी सहा पदरीकरण रुंदीकरणासह भुयारी मार्गाचा प्रस्ताव तयार करुन तोही मंजूरीसाठी पाठविल्याची माहिती बैठकीत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
हेही वाचा… पनवेल: नववीच्या वर्गात काढलेल्या एका लज्जास्पद छायाचित्रामुळे विद्यार्थीनीने जिवनयात्रा संपविली
मात्र या प्रस्तावावर नेमकी कधी मंजुरी मिळेल याविषयी ठोस उत्तर देण्यात आले नाही. मागील अनेक वर्षांपासून मुंब्रा पनवेल महामार्गावरील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत असून हजारो लीटर इंधन वाया जात आहे. मागील अनेक वर्षांपासून एमएसआरडीसीचे अधिकारी या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करत असल्याने ही स्थिती उद्भवल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे. भिमशक्ती संघटनेने यावर पाठपुरावा सूरु केल्यानंतर या प्रश्नाला वाचा फुटली. तसेच भिमशक्तीचे तालुका अध्यक्ष गायकवाड यांनी लवकरच याबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन खा. बारणे यांनी केंद्र सरकारकडे संबंधित कामांच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी पाठपुराव्यासाठी भेट घेणार असल्याचे सुभाष गायकवाड यांनी सांगितले.