scorecardresearch

प्रकल्पग्रस्तांचा संताप

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पाच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र एकवटला आहे. 

मेळावे, परिषदा पुरे, थेट कृती हवी; कामे बंद पाडण्याचा इशारा

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पाच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र एकवटला आहे.  ही मागणी मान्य करण्यासाठी मेळावे व परिषदा कसल्या घेता, केवळ विमानतळाचीच नव्हे तर सिडकोची नवी मुंबई व उरण-पनवेलमधील सर्व विकासाची कामे बंद करा असा संताप गुरुवारी प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त करण्यात आला. पनवेलच्या कोल्ही कोपर येथे झालेल्या भूमिपुत्रांच्या निर्धार परिषदेत या संतप्त भावाना व्यक्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी मानवी साखळी, घेरावाच्या नावाने मेळावा तर त्यानंतर पुन्हा एकदा परिषदेचे आयोजन करण्यात आल्याने आता सिडकोला नमविण्यासाठी काम बंद आंदोलनच हवे असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्व असलेल्या पिकत्या जमिनी, मिठागरे, मासेमारीची ठिकाणे तसेच रेती व इतर जोड व्यवसायांवर पाणी सोडले आहे. अशा विकासासाठी सर्वस्व गमावणाऱ्या भूमिपुत्रांचे नेते लोकनेते दि.बा.पाटील यांचे त्यांच्याच जन्म व कर्मभूमीत होणाऱ्या विमानतळाला नाव देण्यास सिडको, राज्य व केंद्र सरकार टाळाटाळ करीत आहे. या विरोधात रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई व पालघर या पाच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र संघटित झाला आहे. स्थानिकांचा हक्क हा आज नाही तर कधीच नाही ही येथील तरुणांची भावना असून त्यासाठी दि.बा.पाटील यांनी आम्हाला संघषार्चा मंत्र दिला आहे. तसेच भूमिपुत्रांना संघर्षांशिवाय काहीच मिळाले नसल्याचा इतिहास असल्याने आता परिषदा व मेळावे झाले. आता थेट संघषार्ची भूमिका घेण्याची वेळ असल्याचे मत तरुणांकडून व्यक्त केले जात आहेत. 

दि.बा.पाटील यांचे विमानतळाला नाव देण्यासाठी कधी नव्हे तो स्थानिक भूमीपुत्र एक झाला आहे. त्यामुळे या मागणीसह मागील पन्नास वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या गावठाणातील घरे, साडेबारा टक्केचे भूखंड, नागरी सुविधा या सारखेही प्रश्नही प्रलंबित आहेत. या प्रश्नासाठीही लढा देण्यासाठी सिडकोच्या सर्व कामे थांबविण्याची भूमिका घेतली पाहीजे.

– हिरालाल पाटील, प्रकल्पग्रस्त

दि.बा,पाटील याचे नाव हे विमानतळाला मिळालेच पाहीजे, मात्र ते मिळविण्यासाठी आता जनजागरण व परिषदा नको तर थेट कृती हवी. त्या शिवाय सिडको आणि शासन दखल घेणार नाही. त्यामुळे काम बंद आंदोलन केले पाहीजे.

– महेश घरत, प्रकल्पग्रस्त

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anger project victims work gesture ysh

ताज्या बातम्या