नवी मुंबई: देशी बार मध्ये एकाच टेबल वर बसलेल्या दोन ग्राहकात दारू एवढ्या पटापट का पितो यावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यात एकाने घरी जाऊन भावाला सोबत आणून चाकू हल्ला केला. यात दोन जखमी असून त्यातील एक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद होताच संशयित दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने ११ तारखे पर्यंत पोलीस कोठडी फर्मावली आहे.
शंभूदास सुराजूदास (वय ३४) आणि त्याचा भाऊ कैलासदास सुरज दास (वय २५) असे यातील अटक संशयित आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळ बिहारचे असून सध्या तुर्भे एमआयडीसी भागात मिळेल ते काम करून गुजराण करतात.
सोमवारी शंभू दास हा पावणे एमआयडीसीतील जीत देशी बार मध्ये मद्य प्राशन करण्यास गेला होता. त्यावेळी तो ज्या टेबल वर बसला होता त्याच टेबल वर अन्य ग्राहक संदीप वीर आणि प्रकाश पारठे हे मद्य प्राशन करण्यास बसले होते. त्यावेळी पारठे हे एकामागे एक मद्याचे पेले पिऊन संपवत होते. त्यामुळे सहज बोलता बोलता शंभू दास याने एवढ्या पटापट मद्य प्राशन करू नका असा सल्ला दिला. त्याचा राग पारठे आणि संदीप यांना आला. मात्र त्यावेळी ते गप्प बसले मात्र मद्य पिणे झाल्यावर बाहेर थांबले. शंभू दास मद्य प्राशन करून बाहेर पडल्यावर त्याला पारठे आणि संदीप यांनी बेदम मारहाण केली.
स्वतःची कशी बशी सोडवणूक करून शंभूदास घरी गेला. घरी गेल्यावर त्याने घडलेली घटना लहान भाऊ कैलास दास याला सांगितली. मोठ्या भावाला मारहाण झाल्याने संतप्त होत त्याने घरातील चाकू हातात घेत दोघेही पारठे आणि संदीप यांना शोधत बाहेर पडले. काही अंतरावर पारठे आणि संदीप हे रिक्षात बसत असताना दिसताच कैलास याने पारठे याच्या मानेवर आणि पोटावर वार केले. त्याला सोडवण्यास आलेल्या संदीप यांच्यावरही वार करून दोघे भाऊ पळून गेले. याबाबत तुर्भे पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पारठे आणि संदीप यांना रुग्णालयात दाखल केले असून संदीप याची प्रकृती ठीक आहे तर पारठे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी अगोदर संशयित आरोपींची ओळख पटवली आणि त्या नंतर शोध घेत मंगळवारी पहाटे त्यांना याच परिसरातून अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही ११ तारखे पर्यंत पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम नागरे करीत आहेत.