पनवेल : मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालयात काम करणा-या ३२ वर्षीय डॉक्टर ओंकार कविताके यांनी अटलसेतूवरुन सोमवारी रात्री उडी मारल्यानंतर ४४ तास उलटले तरी अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. सागरी सूरक्षा पोलीस बोटीच्या माध्यमातून आणि खाडीक्षेत्रात मासेमारी करणा-यांकडून सुद्धा डॉ. ओंकार यांचा शोध सुरूच आहे. बेपत्ता डॉ. ओंकार हे न सापडल्याने कविताके यांचे कुटूंबिय तणावाखाली आहे.
नवी मुंबईत राहणारे डॉ. ओंकार यांना शिवडी न्हावा सागरी मार्गावर (अटल सेतू) सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता या मार्गाने जाणा-या एका मोटारचालकाने पुलावरील रेलिंग ओलांडताना पाहीले. या मोटारचालकाला संशय आल्याने त्यांनी याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यावर तेथे काही वेळात अटलसेतूवरील बचावदलाचे पथक पोहचले. यावेळी डॉ. ओंकार हे तिथे सापडले नाहीत. मात्र त्यांची मोटार सापडली. या मोटारीत त्यांचा मोबाईल फोनमुळे त्यांची ओळख पटली. ओंकार यांचे बोलणे त्यांच्या आईसोबत झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
पोलिसांनी यानंतर बचावदलाची मदत घेऊन डॉ. ओंकार यांची शोधमोहीम सुरू केली. मात्र या मोहिमेला अपय़श आले. नवी मुंबईतील कळंबोलीत राहणारे डॉ. ओंकार हे गेल्या सहा वर्षांपासून सर जे.जे. रुग्णालयात काम करत होते. त्यांनी अटल सेतूवरून का उडी मारली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. ओंकार यांनी स्वताच्या आईला घरी जेवणासाठी येत असल्याचे सांगीतले होते. मात्र अचानक ओंकार यांनी हे पाऊल का उचलले या विवंचणेत कविताके कुटूंबिय आहेत.
डॉ. ओंकार कविताके यांनी ७ जुलैला रात्री सव्वा नऊ वाजता अटलसेतूवरून उडी मारल्याचे समजताच घटनास्थळी बचावदलासह पोलिसांचे पथक पोहचले. तातडीने सागरी सूरक्षा बोटीच्या साह्याने शोधमोहिम राबवली. खाडीक्षेत्रात मासेमारी करणा-यांचा एकह समुह गट समाजमाध्यमांवर आहे त्यावर सुद्धा याबाबतची माहिती दिली. इतर सागरी पोलिस ठाण्यात सुद्धा याबाबतची माहिती दिली आहे. डॉ. ओंकार यांची शोधमोहिम अजूनही सुरूच आहेत. – अर्जुन रजाने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, उलवा पोलीस ठाणे.