नवी मुंबई : शनिवारी दुपारी वाशी सेक्टर १२ येथे असलेल्या पदपथ शेजारी पार्क केलेल्या रिक्षात बेवारस बॅग आढळून आल्यावर परिसरात घबराटीचे वातावरण होते. वाशी पोलीस आणि बॉम्ब शोध पथकास पाचारण करण्यात आले होते . मात्र बॅगेत काहीही संशयास्पद आढळून न आल्याने पोलिसांनी निश्वास सोडला. 

वाशी आणि कोपरखैरणेच्या सीमेवर असलेल्या सेक्टर १२ येथे एका विकासकांच्या कार्यालयाबाहेर एक रिक्षा पार्क करून रिक्षा चालक संशयास्पद रित्या पळून गेला. रिक्षात एक बॅग होती. या बाबत पोलिसांना माहिती मिळताच वाशी पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहचले. सोबत बाँब शोध पथक ही आले. पोलीस पथकातील श्वानाला अगोदर बॅग जवळ घेऊन जाण्यात आले.

श्वानाला काही संशयास्पद आढळून न आल्याने पोलिसांनीही पाहणी केली. रिक्षा किंवा बॅगेत काहीही स्फोटक नसल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी निश्वास सोडला. मात्र रिक्षा चालक असा पळून का गेला ? याबाबत तपास सुरू आहे. शेवटी रात्री उशीरा रिक्षा चालक पोलिसांनी शोधून काढला तसेच बॅग मालक हि शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. बॅगत केवळ कपडे होते. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डी डी टेळे यांनी दिली.