उरण तालुक्यातील रानसई आदिवासीवाडी परिसर व पनवेलमधील कर्नाळा अभयारण्य या विभागांत मृतावस्थेत गाय मारल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी उरण व पनवेल विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवीत बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी रानसईमध्ये कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यात रानसई परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याचे कॅमेऱ्यात टिपण्यात आलेले आहे. त्यामुळे रानसईमधील सातही वाडय़ांतील आदिवासींमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
उरण तालुक्यात २०११ मध्ये करंजा परिसरात एक बिबटय़ा आढळला होता. त्याला पकडून तो वन विभागाच्या हवाली करण्यात आल्यानंतर वारंवार चिरनेरच्या जंगल परिसरातही बिबटय़ा असल्याच्या वावडय़ा उठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०१५ मध्ये आवरे कडाप्पे या गावाच्या जंगलात बिबटय़ा असल्याचा संशय असल्याने बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरेही लावण्यात आलेले होते. मात्र त्याचा उपयोग झालाच नाही. त्यानंतर मागील महिनाभरापासून कर्नाळा व रानसई परिसरात बिबटय़ा असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रानसई आदिवासीवाडीतील सागाच्या वाडीच्या पूर्वेकडील भागात एक गाय मारण्यात आली होती. त्यानंतर पनवेल वन विभागाने या परिसरात शोधमोहीमही राबविली होती. त्यानंतर रानसई विभागात बिबटय़ा पाहिल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने या परिसरात कॅमेरा लावून बिबटय़ाच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला. या कॅमेऱ्यात बिबटय़ा असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती उरणच्या वन विभागाचे वनपाल चंद्रकांत मराडे यांनी दिली आहे. त्यामुळे रानसई आदिवासीवाडीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. येथील आदिवासी दररोज रात्री उशिरापर्यंत शेजारील गावातील आपापली कामे आटोपून परतत असल्याने त्यांच्या कामकाजावरच परिणाम झाला आहे. तर या आदिवासीवाडीवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे पाणी आणण्यासाठी वाडीपासून दूर जाता येत नसल्याने पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर वन विभागाने बिबटय़ाचा शोध लावावा अशी मागणी आदिवासींकडून केली जात आहे.
