लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांच्या बंडखोरीमुळे चर्चेत आलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लक्ष केंद्रित केले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी ठाण मांडत प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक रणनीतीसंबंधी चर्चा केली. भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनीही दोन दिवसांपूर्वी बेलापुरात संघ आणि भाजपच्या प्रमुख मंडळींसोबत बैठक घेत प्रचार आखणीचा आढावा घेतला. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक सभा नेरुळ येथे आयोजित केली जाणार असून यासंबंधीचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

आणखी वाचा-एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बेलापूरकडे लक्ष केंद्रित केले असताना ऐरोलीत मात्र या पातळीवर शुकशुकाट दिसू लागला आहे. ऐरोलीत भाजपच्या चिन्हावर गणेश नाईक स्वत: निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी नाईक यांची स्वत:ची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी बंडखोरी केली असली तरी भाजपच्या सर्वेक्षणात ही जागा अजूनही ‘सुरक्षित’ मानली जात आहे. तुलनेने बेलापुरातील लढत रंगतदार अवस्थेत असल्यामुळे भाजप आणि संघ परिवाराने संपूर्ण ताकद या मतदारसंघात वापरण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसू लागले आहे. संघ, भाजप पदाधिकारी, प्रचाराच्या बैठकांचे जोरदार सत्र या मतदारसंघात सुरू असून वेगवेगळ्या समाजसंघटना, जातींच्या मंडळांबरोबरच्या बैठकांनाही या ठिकाणी जोर आला आहे.

ऐरोलीत नाईकांची स्वतंत्र्य यंत्रणा बेलापूरमध्ये पक्षाची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली जात असताना भाजपच्या नेत्यांनी ऐरोलीत मात्र फारसे लक्ष घातलेले नाही. या ठिकाणी गणेश नाईक यांनी स्वत:ची प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली असून राज्य भाजपकडून या ठिकाणी पाठविण्यात आलेली निरीक्षक तसेच प्रचारकांची कुमक कमी करूनही तीही बेलापुरात आणली जाईल, असे ठरल्याचे समजते.

आणखी वाचा-राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

रवींद्र चव्हाण यांची बेलापूरवारी

ठाणे जिल्ह्यात भाजप नऊ जागांवर निवडणूक लढवीत असून बेलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी पश्चिम, उल्हासनगर, कल्याण पूर्व यांसारख्या मतदारसंघांत पक्षापुढे आव्हानात्मक स्थिती आहे. नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित मानले जात होते. मात्र बेलापूरमध्ये संदीप नाईक यांच्या बंडखोरीमुळे इथली चुरस वाढली असून भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी दिवसभर ठाणे शहरात बैठका घेतल्या. सायंकाळनंतर ते बेलापूर मतदारसंघात स्थिरावले. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, संघाचे पदाधिकारी तसेच प्रचार यंत्रणेतील प्रमुख मंडळींसोबत त्यांनी बैठका घेतल्या. ‘बेलापुरात काय हवंय ते थेट सांगा’ अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील दुवा मानला जाणाऱ्या संघटनमंत्र्यांना यंदा महाराष्ट्राच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी पाठविण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिव प्रकाश यांनी बेलापूर मतदारसंघात दोन दिवसांपूर्वी दिवसभर ठाण मांडून बैठका घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नेरुळ येथे सभा आयोजित केली जाणार असून या सभेचे ठिकाण तसेच पूर्वतयारीसाठी आवश्यक आखणीची चर्चा या बैठकीत करण्यात आली. नेरुळ येथील राम लीला मैदान या सभेसाठी निश्चित केले जात आहे. दरम्यान भाजपची प्रचार यंत्रणा सक्रिय करताना कोणकोणते मुद्दे प्रचारात आणले जावेत तसेच वेगवेगळ्या समाज संघटनांच्या प्रतिनिधींसोबत कशा प्रकारे बैठका केल्या जाव्यात याची आखणीही यावेळी पूर्ण केल्याचे समजते.