नवी मुंबई : राज्यात सत्ता असूनही नवी मुंबई शहरातील प्रशासकीय व्यवस्थेच्या असहकारामुळे प्रभागांमधील कामे होत नसल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या बैठकीत नाराजीचा सूर लावला. नवी मुंबई महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या प्रभागांमधील प्रश्नांसंबंधी एक आढावा बैठक नुकतीच वाशी येथे घेण्यात आली होती.

महापालिका आयुक्त आमच्या विकासकामांच्या फाईली अडवून ठेवतात. त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांच्या कामांना प्राधान्य दिले जाते. या असहाकाराविरोधात आक्रमक होण्याची वेळ आली आहे, असाही बैठकीतला सूर होता.

दरम्यान, नागरिकांच्या प्रश्नांसाठी सिडको, महापालिका, एमआयडीसीतील अधिकाऱ्यांची भेट घ्या. वेळ पडलीत तर लोकशाही मार्गाने त्यांना घेराव घाला. त्यांचे जेवणाचे डबेही कार्यालयात पोहचणार नाहीत, अशी भूमिका घ्या. लोकांच्या न्यायहक्कासाठी गुन्हे अंगावर घ्या, अशी भूमिका नाईक यांनी बैठकीत घेतल्याचे समजते.

या बैठकीत नवी मुंबईतील माजी नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी प्रभागांमधील विविध विकासकामांना निधीअभावी स्थगिती देण्यात आल्याचा मुद्दा मांडला. या कामांची पूर्तता आठ ते दहा दिवसांत करण्यात आली नाही तर मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेत हे मुद्दे मांडण्यात येतील असा इशारा नाईकांनी दिला.

निधी नाही असे कारण पुढे करत आमच्या प्रभागातील कामांना स्थगिती दिली जाते. महापालिका आयुक्त आमच्या प्रभागातील कामांच्या फाईली अडवून ठेवतात. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांना हिरवा गालिचा अंथरला जातो, अशी टिका यावेळी काहींनी केली.

संजीव नाईक काय म्हणाले?

या बैठकीनंतर माजी खासदार संजीव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘छोट्या छोट्या कारणांवरून राजकारण करून विकासकामांना अडथळा आणला जात आहे. हे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत. संबंधित अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या वेळेत कामांची पूर्तता केली नाही, तर आम्ही सिडको, एमआयडीसी आणि महापालिका कार्यालयांना घेराव घालू.

सर्व प्रलंबित कामांची अंमलबजावणी पुढील आठ ते दहा दिवसांत सुरू झाली नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या विषयावर निर्णय घेतला जाईल असेही नाईक यावेळी म्हणाले.